
बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
बारामती : बारामती शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा साधेपणाने आणि शांततेत पार पडली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे सावट गणेशोत्सवावर स्पष्टपणे जाणवले. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणारा गणेशोत्सव यंदा अनेक मंडळांनी साध्या पद्धतीने साजरा केला आहे. शहरातील प्रमुख आठ गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
अखिल मंडई मंडळ ट्रस्टच्या मानाच्या पहिल्या श्री गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. यंदा मंडळाच्या वतीने १३ बाय २२ फूट उंचीचा भव्य सूर्यरथ साकारण्यात आला होता. रथावर सूर्य तसेच सूर्याविषयी माहिती देणारे खांब उभारण्यात आले होते. श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान वाद्य पथकाने सुमारे १०० ढोलांच्या गजरात गणरायाला निरोप दिला. तसेच बावधन येथील बगाडाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. सुमारे २० फूट उंचीच्या या बगाडावर नवसाचा लटकलेला उभा माणूस अशी प्रतिकृती साकारण्यात आल्याने ती लक्षवेधी ठरली. श्री समर्थ वाद्य पथकाने अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणारे देखावे साकारले. सुमारे ८० ढोलांच्या वादनासह अघोरी, खंडोबाचा गोंधळ, काळभैरव यांसारखे विविध देखावे आणि पारंपरिक वादन साद करण्यात आले.
शहरात ४० ठिकाणी जलकुंभाची व्यवस्था
नटराज नाट्य कला मंडळाच्या गणेशमूर्तीचे पारंपरिक पद्धतीने कृत्रिम जलकुंभात विसर्जन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशभक्तांनी विसर्जन केले. बारामती नगरपालिकेच्या वतीने शहरात ४० ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली होती. घरगुती तसेच छोट्या-मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे जलकुंभात विसर्जन करण्यात आले. अखिल मंडई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष निलेश धालपे यांच्यासह आशिष घोरपडे, महावीर जवारे, अश्विन भोकरे, आनंद खुळपे, सुधीर वाडेकर, अक्षय नवले, पप्पू धनराळे, विनीत बहादुरकर, चेतन वाडेकर, स्वप्निल खरात, मनोज भागवत, अनिकेत धालपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मिरवणुकीसाठी परिश्रम घेतले.
हे सुद्धा वाचा : माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
शहरात चोख पोलीस बंदोबस्त
अखिल मंडई मंडळासह सिनेमा रोडवरील नटराज गणेश मंडळ, श्रीराम गल्लीतील गणेश मंडळ यांच्यासह शहरातील अन्य प्रमुख मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परविक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे, पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.