
दिग्गजांना नवख्यांकडून घरचा रस्ता; 'या' बड्या नेत्यांचा पराभुतांमध्ये समावेश
सहावेळा नगरसेवकपद भूषविलेले व शिवसेनेकडून लढविणाऱ्या आबा बागुल यांचा भाजपच्या महेश वाबळे यांनी पराभव केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा भाजपच्या संदीप बेलदरे यांनी पराभव केला, तर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रकाश कदम यांचा भाजपच्या नवख्या व्यंकोजी खोपडे यांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या वीणा गणेश घोष यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांचा भाजप शैलजा भोसले यांनी पराभव केला.
पुणेकरांचे लक्ष लागलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचा गणेश बिडकर यांनी पराभव करून २०१७ च्या पराभवाची परतफेड केली. तर धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी पराभव केला. धंगेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना अटीतटीच्या लढतीत अवघ्या ६२ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या विवेक यादव यांनी त्यांचा पराभव केला, तर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना राष्ट्रवादीचे निवृत्त बांदल यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचाही पराभव झाला, तर माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांना त्यांचे पुतणे भाजपचे उमेश गायकवाड यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. गायकवाड यांनी मनसेचे नेते बाबू वागस्कर यांचा पराभव केला, तर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांना भाजपच्या निवेदिता एकबोटे यांच्याकडून थोडक्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या बंडू ढोरे यांचाही भाजपच्या सनी निम्हण यांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसवासी झालेले प्रशांत जगताप विजयी झाले, तर त्यांच्या मातोश्री ज्येष्ठ माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांनाही भाजपच्या कालिंदी पुंडे यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत अखेरच्या क्षणी शिवसेनेतून भाजपवासी झालेले माजी नगरसेवक संजय भोसले यांना काँग्रेसच्या विशाल मलके यांनी पराभवाची धूळ चारली. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या सुनीता गलांडे आणि संदीप जऱ्हाड यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील अमाेल बालवडकर आणि भाजपचे लहू बालवडकर यांची लढत ही लक्षवेधी हाेती. या लढतीत अमाेल बालवडकर यांनी बाजी मारली. तसेच या प्रभागात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे हे देखील विजयी झाले. त्यांनी भाजपचे गणेश कळमकर यांचा पराभव केला. एकीकडे भाजपला दणदणीत यश मिळाले असतानाच भाजपच्या माजी नगरसेविका व माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांचा काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी धक्कादायक रित्या पराभव केला, तर वारजे-कर्वेनगर भागातील भाजपचे माजी नगरसेवक सुशील मेंगडे यांचा राष्ट्रवादीच्या स्वप्नील दुधाने यांनी पराभव केला.