पुणे/ओमकुमार वाघमोडे: महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर सध्या एक मोठे स्थित्यंतर घडत आहे. एकेकाळी राज्याच्या संस्कृती आणि भाषेचे प्रतीक असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा आज अनेक आव्हानांना सामोऱ्या जात आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि देशभरातून येणारा हिंदीवादाचा दबाव, या दुहेरी संकटामुळे मराठी शाळांचे भविष्य धोक्यात आल्याची चिंता शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. ‘ग्लोबल व्हिलेज’च्या संकल्पनेत इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढल्याने, पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवण्यास प्राधान्य देत आहेत. मुंबईत फेब्रुवारी २०२५ मध्ये ७३ नवीन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या त्या पैकी ६५ शाळा ह्या इंग्रजी माध्यमांच्या आहेत.
कमी पटसंख्या, अभ्यासक्रमाचा अभाव
चांगल्या नोकरीच्या संधी, उच्च शिक्षणातील सोयीस्करता आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या कल्पनांमुळे इंग्रजी माध्यमांकडे ओढा वाढला आहे. यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत असून, अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठी शाळांमध्ये कमी पटसंख्या, अद्ययावत अभ्यासक्रमाचा अभाव यांसारख्या समस्या देखील इंग्रजी माध्यमांकडे पालकांना आकर्षित करत आहेत.
‘मल्टीलिंग्वल’ दृष्टिकोन स्वीकारावा
काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते, मराठी शाळांनी केवळ पारंपरिक शिक्षण पद्धतीवर अवलंबून न राहता, इंग्रजी आणि इतर भाषांचे शिक्षणही समाविष्ट करून एक ‘मल्टीलिंग्वल’ (बहुभाषिक) दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान मिळेल आणि ते मराठी भाषेपासून दूर जाणार नाहीत. मराठी भाषेला केवळ भावनात्मकरित्या न पाहता, तिला रोजगाराशी आणि प्रगतीशी जोडणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी, मराठी शाळांना बळकटी देणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, भविष्यात महाराष्ट्रात मराठी शाळा केवळ इतिहासाचा भाग बनतील अशी भीती व्यक्त होत आहे.
शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आवश्यक
इंग्रजी माध्यमांच्या प्रभावाबरोबरच, सध्या देशभरातून येणारा हिंदीवादाचा दबाव देखील मराठी भाषेसाठी एक नवीन आव्हान निर्माण करत आहे. केंद्र सरकारकडून हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून अधिकृतपणे स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असून, अनेक योजना आणि धोरणे हिंदीला प्रोत्साहन देत आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढल्याने, हिंदीचा वापर वाढताना दिसत आहे. यामुळे मराठी भाषेचे महत्त्व कमी होत असल्याची भावना अनेक मराठी भाषिकांमध्ये आहे. शिक्षण, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनात हिंदीचा वाढता वापर मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. मराठी शाळांना वाचवण्यासाठी आणि मराठी भाषेचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अद्ययावत अभ्यासक्रम लागू करणे आणि शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
वयाच्या ठराविक टप्प्यानंतर बहुभाषिकत्त्व प्राप्त करणे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे पण मुळात मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी भारतीय ज्ञान प्रणालीचा योग्य प्रसार आणि प्रचार महत्त्वाचा आहे आणि मराठी भाषे ची वैशिष्ट्ये योग्य रीतीने रुजवणे गरजेचे आहे.
– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता,
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ
सरकारने मागील वीस वर्षांपासून मागेल त्याला इंग्रजी माध्यमिक शाळा दिल्या त्यामुळे गल्लीबोळात गावागावात इंग्रजी माध्यम शाळा झाल्या त्यामुळे साहजिकच पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढला इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या इमारती इतर सुविधा या मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा चांगल्या असल्याने तसेच सामाजिक प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी इंग्रजी माध्यमाला पालक पसंती देतात परंतु गुणवत्ता पाहिली जात नाही याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करीयरवर निश्चित होत आहे
– प्रसाद गायकवाड,
अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ