'...तेव्हा संजय राऊत यांना चक्कर येईल'; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं?
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पाचशे पानांचे पुस्तक लिहिले आहे. त्याचे लवकरच पुण्यात प्रकाशन होईल. तेव्हा संजय राऊत यांना चक्कर येईल, अशी उपरोधिक टीका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘संजय राऊत हे रोज विविध शोध लावतात’, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्याच्या दौऱ्यावर शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यास मंत्री पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘संजय राऊत हे रोज विविध शोध लावतात. गृहमंत्री अमित शाह रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचे दर्शन घ्यायला आले होते. समाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण झाली. त्याविषयी बोलायचे सोडून गेल्या तीन दिवसांपासून राऊत बोलत आहे. पण त्यांना कोणीच प्रतिसाद देत नाही’.
तसेच राजकीय वैमनस्य असावे. पण अमित शहा यांनी स्वतः पाचशे पानांचे शिवाजी महाराजांवर केलेलं पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात की दिल्लीमध्ये प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर राऊत तुम्हाला चक्कर येईल, असे पाटील यांनी म्हटले आहे. अमित शाह यांच्यासोबत तुम्ही सत्तेत नाही आणि तुम्हाला यायचं आहे. पण आम्ही घेत नाही. आज अनेक लोक तुम्हाला सोडून जात आहे, ते सोडून तुम्ही अमित भाई यांच्यावर टीका करत आहे, असेही पाटील म्हणाले.
…तरी भांड्याला भांड लागते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा सुरु असल्याविषयीच्या चर्चा सुरु आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,‘‘ एका रक्ताचे चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांडं लागते. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अजितदादांची वेगळी, एकनाथ शिंदे यांची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीची लोक एकत्र काम करतात. खळखळ झाली म्हणजे ते जिवंत आहेत, असं समजायचे.’’