पुणे: ‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’ अशी घाेषणा करीत आमदार हेमंत रासने यांनी मतदारसंघ ‘फ्लेक्समुक्त’ करण्याची घाेषणा केली आहे. त्यांच्या या आवाहनाला भाजपचे कार्यकर्ते प्रतिसाद देतील का ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. एकही अनधिकृत फ्लेक्स उभारला जाणार नाही, तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ( ता. २६ ) मतदारसंघात २६ ठिकाणी ‘स्वच्छता नारायण’ महापुजा आयाेजित केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
आमदार म्हणून निवडुन आल्यानंतर रासने यांनी कसबा मतदारसंघातील स्वच्छतेचा प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. देशात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदाैर शहराचा त्यांनी महापािलकेचे सफाई कर्मचारी, अधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदींचा अभ्यास दाैराही आयाेजित केला हाेता. या दाैऱ्यात इंदाैर शहर हे प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर झाल्याचे निदर्शनास आले हाेते, असे नमूद करीत रासने यांनी पत्रकार परीषदेत कसबा मतदारसंघात यापुढे सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याचा निर्णय मी घेतल्याचे जाहीर केले. शहरातील स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहराच्या विद्रुपीकरणात अनधिकृतपणे उभारले जाणारे फ्लेक्सचे प्रमाण अधिक आहे. या अनधिकृत फ्लेक्स मध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून उभे केल्या जाणाऱ्या फ्लेक्सचा समावेश अधिक आहे. स्थानिक नेत्यांचे, प्रमुख नेत्यांचे वाढदिवस – दाैरा, कार्यकर्त्यांचे वाढदिवस अादि निमित्ताने हे फ्लेक्स लावले जातात. महापािलकेच्या आकाश चिन परवाना विभागाकडून या फ्लेक्सवर कारवाई करण्यात येत नाही. राजकीय दबावामुळे ही कारवाई हाेत नसल्याने अनधिकृत फ्लेक्सची संख्या माेठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापुर्वी देखील पक्षाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना अनधिकृत फ्लेक्स लावू नये असे आवाहन केले हाेते. आता आमदार रासने यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मतदारसंघात अनधिकृत फ्लेक्स लागणार नाही याची काळजी घेतली आहे. परंतु, त्यांच्या या निर्णयाला भाजपचे कार्यकर्ते – पदाधिकारी कितपत साथ देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
२६ ठिकाणी स्वच्छता नारायणाची महापुजा
मतदारसंघातील कचरा साठणारे 26 क्रॉनिकल स्पॉट सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बंद करण्यात यश मिळाले आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी (26 फेब्रुवारी) सायंकाळी 5 ते 7 या वेळेत या 26 ठिकाणी ‘स्वच्छता नारायणा’च्या महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे पूजन यावेळी केले जाणार आहे.
मतदारसंघातील पुढील कामे पाच वर्षांत मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार रासने यांनी सांगितले. यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियान, शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सारसबाग ते शनिवारवाडा (बाजीराव रस्ता) आणि शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) भुयारी मार्ग, सारसबाग आणि पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास, ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील जुन्यावाड्यांचा प्रश्न, डॉ.कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास, खडक पोलीस वसाहतीतील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी, मामलेदार कचेरी येथील रखडलेले शासकीय इमारतींचे बांधकाम पुर्ण करणे, दुरावस्था झालेल्या पुणे महानगरपालिका वसाहतींचा पुनर्विकास, नेहरू स्टेडियमचा खेळासाठी विकास, लोकमान्यनगर भागातील म्हाडा प्रकल्पाचा एकात्मिक विकास, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी शासकीय जागा हस्तांतरित करण्याची विनंती, श्री कसबा गणपती मंदिर, श्री ओमकारेश्वर मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांना ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचा समावेश आहे.