सोमेश्वरच्या निवडणुकीत नवे समीकरण; पुरुषोत्तम जगतापांचे स्वतंत्र पॅनेल, सुनेत्रा पवारांसमोर आव्हान
बारामती / अमोल तोरणे : बारामतीच्या सहकार क्षेत्रात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेपासून वेगळी वाट स्वीकारत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ या स्वतंत्र पॅनेल उभारण्याची घोषणा केली आहे.
भाजपचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांची साथ मिळाल्याने या निवडणुकीतील समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. आपली भूमिका पक्ष विरहित असल्याचे सांगत शेतकरी आज आपला पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेली दहा वर्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांचे गाव असलेल्या वाणेवाडी (ता. बारामती) येथे अचानक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. काल रात्रीपासून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम जगताप भाजपबरोबर जाणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती. यातच अचानक जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून राष्ट्रवादीला धक्का दिला.
सोमेश्वर कारखाना हा सभासदांच्या प्रपंचाशी निगडित असलेला कारखाना आहे. त्यामुळे संचालक मंडळामध्ये स्वार्थ न ठेवता कारखाना सांभाळण्याची क्षमता असलेली चांगली माणसे संचालक मंडळात असली पाहिजेत, अजित दादांनी नेहमीच आपल्याला पाठबळ दिले, त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आपण चालवला. आज ते हयात नाहीत, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचा आदर ठेवून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अनुभव नसताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही निवडणूक सांभाळत आहेत, मात्र या निवडणुकीत जो प्रयत्न करायला पाहिजे तो झाला नाही.
अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापुढेही लढत राहणार
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह सुदामराव इंगळे तसेच माणिकराव झेंडे यांच्या सहकार्याने यापूर्वीही निवडणूक लढवली आहे, अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण यापुढेही लढत राहणार आहोत. सभासदांच्या हितासाठी नवीन पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाईल. प्रचारामध्ये कोणावरही टीका न करता आपण आपली भूमिका मांडू, असे पुरुषोत्तम जगताप यांनी यावेळी सांगितले.
अजितदादांचे नाव व छायाचित्र वापरू नका
राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून, यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव व छायाचित्र त्यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू नये, असे आवाहन केले आहे. मात्र, पुरुषोत्तम जगताप यांनी चक्क अजितदादांचे नाव जाहीर केलेल्या पॅनलला दिल्याने याची राजकीय पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री व आमच्यामध्ये ‘मिस कम्युनिकेशन’
दोन दिवसापूर्वी मला वरिष्ठांकडून इच्छुक उमेदवारांची यादी देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार, आपण सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनुभवी व चांगल्या उमेदवारांची यादी दिली होती. वास्तविक पत्ता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व आमच्यामध्ये मिस कम्युनिकेशन झाले. मात्र, आपण दिलेल्या यादीचा कोणताही विचार झाला नसल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतला आहे. मात्र, अजूनही वेळ गेलेले नाही, आपण दिलेल्या यादीवर योग्य विचार झाल्यास आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लढवू, असे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.






