नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण ॲप विकसित करण्यात आले असून, नागरिकांना या ॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची मान्सूनपूर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची समस्या सातत्याने उद्भवते. या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने पॉटहोल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे खड्डयांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ होणार आहे. नागरिक या ॲपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवू शकतात, आणि त्या तक्रारीच्या निराकरणाविषयी अद्ययावत माहिती मिळवू शकतात.
नागरिकांना अशी नोंदवता येणार तक्रार
ॲपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना प्रथम पॉटहोल ॲपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिक खड्याचे फोटो काढून त्याच्या स्थळासह ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या प्रभागानुसार पाठवली जाईल. याचवेळी ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवली जाईल. तक्रारी नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे दिली जाईल. दिलेल्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर त्या भागातील वरिष्ठ अधिकारी यांना ईमेल आणि संदेश पाठवण्यात येईल.
तक्रार कनिष्ठ अभियंता यांच्या अधीन नसल्यास…
एखादी तक्रार कनिष्ठ अभियंता यांच्या अधीन नसल्यास ती महानगरपालिकेच्या ज्या विभागाशी आहे, त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार ॲपमध्ये बंद केली जाईल आणि तक्रारदारास फोटोसह निराकरणाची माहिती ईमेल / संदेशाद्वारे कळवली जाईल.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांना देखील महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी, यासाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. खड्डे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेची वाढ करून रस्ते अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.