हिंजवडी: हिंजवडी हा परिसर राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असा भाग आहे. हिंजवडीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयटी कंपन्या स्थित आहेत. या ठिकाणची सुरक्षा महत्वाचा विषय आहे. दरम्यान काल दुपारच्या सुमारास हिंजवडीच्या फेज २ मध्ये अचानक सैन्य दलाचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने एका कंपनीच्या टेरेसवर उतरले त्यामुळे त्या परिसरात असणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र हे एनएसजी कमांडो का उतरले हे कोणालाही लक्षात येत नव्हते.
हिंजवडी आयटी पार्क रोजच्या प्रमाणेच वर्दळ सुरु होती. अचानक त्या ठिकाण हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू येऊ लागला. सर्वाना कोणीतरी राजकारणी मंडळी किंवा उद्योगपती हिंजवडी आयटी पार्कला भेट द्यायला आले असावेत असे वाटले. मात्र हे हेलिकॉप्टर एका कंपनीच्या टेरेसवर आले आणि त्यातून रोपच्या मदतीने थेट एनएसजी कमांडो उतरले.
हत्यारबंद एनएसजी कमांडो पाहून कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र काही काळाने हे मॉक ड्रिल असल्याचे समजले. मॉक ड्रिल असल्याचे समजताच येथील कर्मचारी वर्ग आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हिंजवडी हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी अनेक मोठ्या आयटी कंपन्या आहेत. हजारो आयटी कर्मचारी येथे काम करतात.
या ठिकाणी दहशवतादी हल्ला झाल्यास त्या हल्ल्याला कसे सामोरे जायचे यासाठी एनएसजी कमांडो आणि औद्योगिक सुरक्षा यंत्रणेत मिळून एक मॉक ड्रिल करण्यात आले. अशा प्रकारचा हल्ला झाल्यास सुरक्षा यंत्रणांमध्ये कशा प्रकारे संवाद राहील, कशाप्रकारे अशा हल्ल्याला तोंड द्यायचे, असे या मॉक ड्रिलमधून करण्यात आले. जवळपास सुमारे ४ तासांपेक्षा अधिक काळ हे मॉक ड्रिल सुरु होते.
नेमके काय घडले?
काल म्हणजेच बुधवारी दुपारच्या वेळेत हेलिकॉप्टरमधून रोपच्या मदतीने एनएसजी कमांडो एका कंपनीच्या टेरेसवर उतरले. अचानक हेलिकॉप्टरचा आवाज आणि इतके सारे कमांडो पाहून तेथील आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र नंतर काही काळाने हे मॉक ड्रिल असल्याचे समजताच थेतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या मॉक ड्रिलमध्ये शंभरपेक्षा अधिक एनएसजी कमांडो, स्थानिक हिंजवडी पोलीस, एमआयडीसी, क्विक रिअक्शन आणि अन्य आपत्कालीन यंत्रणांनी सहभाग घेतला होता.
काहीच वेळात या मॉक ड्रिलची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. व्हिडीओ पोस्ट करण्यात आले. अनेकांनी अनेक प्रश्नांचा भडिमार केला. मात्र हे एक सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन स्थिती ओढावलीच काय करायचे यासाठी केलेले एक मॉक ड्रिल होते.