पिंपरी: पवना आणि मुळशी धरणांमधून सोमवारी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) नदीकाठच्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पवना धरण सद्यस्थितीमध्ये *77.54%* भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने 2800 क्युसेक्स मुक्त विसर्ग चालू आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत घाटमाथा व पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंग यांनी आपत्कालीन प्रतिसाद पथकांना पूर्ण सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरिकांनी नदीकाठच्या भागांमध्ये जाणे टाळावे, तसेच सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपत्ती परिस्थितीत तातडीने कारवाई करता यावी म्हणून पीसीएमसीची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक साधनसामुग्रीसह बचावपथके तैनात करण्यात आली आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे शेखर सिंग यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने नागरिकांना कोणतीही अफवा न पसरवता, अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांनुसारच वर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार
राज्यात गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. काल अनेक जिल्ह्यात पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. तर आज देखील हवामान विभागाने राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर आज कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट देण्यात आला आहे ते जाणून घेऊयात.
गेले काही दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा, तर पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.