
Pune News: 'PMP'मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात...
सर्वाधिक तक्रारी चालक व वाहनांसंदर्भात
वर्षभरात ३४ हजार ८४३ तक्रारी दाखल
पुण्याची जीवनवाहिनी म्हणून पीएमपीची ओळख
चंद्रकांत कांबळे/पुणे: पुणेकरांची जीवन वाहिनी असलेल्या पीएमपीविरोधात तक्रारींचा धो-धो पाऊस पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्वच्छता, चालक, वाहक तसेच मोबाईल ॲप यासंदंर्भातील या तक्रारी असून, जवळपास १५ विविध कारणे देत पुणेकरांनी पीएमपीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांना ‘सेवा’ पुरविणाऱ्या पीएमपीला आणखी सुधारणा करण्याची अत्यंत गरज असल्याचे दिसत आहे. चालू वर्षात तब्बल ३५ हजार तक्रारी आल्या आहेत. आता या तक्रारीवरून प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली, हा संशोधनाचा विषय होईल.
पीएमपी सेवा ही पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. लाखो प्रवासी यामधून दररोज प्रवास करतात. त्यामुळे याला विशेष महत्व आहे. पण, अनेकवेळा प्रवाशांना या पीएमपीचा त्रास सहन करावा लागतो. कधी पीएमपीमध्येच बंद पडते, तर कधी पीएमपी थांब्यावर थांबतच नाही. ती वेळेवर कधी पोहचतच नाही,अशा प्रमुख समस्यांनी प्रवाशी वैतागलेले असतात. त्यात आता प्रशासनाने प्रवाशांसाठी सुरू केलेले पीएमपीएलचे ऑनलाईन सेवा, पीएमपीमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य झालेले असते. प्रचंड दुर्गंधी प्रवाशांना सहन करावी लागते. त्यासोबतच चालक व वाहक यांच्या बोलण्याचा ‘टोन’ प्रवाशांसोबत उर्मट, किंवा आवाजावी मोठा असतो. विशेष म्हणजे, चालक व वाहक यांच्यासंदंर्भात सर्वाधिक तक्रारी चालू वर्षात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चालक व वाहक यांची ‘शाळा’ घेण्याची गरज निर्माण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल
येवढे तक्रारी येत असताना देखील बस सेवेत अपेक्षित सुधारणा होताना दिसून येत नाहीत. प्रवाशांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींकडे प्रशासन गांभीर्याने पाहात नसल्याचा आरोप होत असून, तक्रारी ‘निकाली’ काढल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात समस्या तशाच आहेत. पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. यातून रोज १० ते ११ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवासादरम्यान बस थांब्यावर न थांबवणे, गाडी उशिरा आणणे, अस्वच्छ बस, नवीन मार्गांची मागणी, सिग्नल न पाळणे, वेगाने वाहन चालवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या जात आहेत. परंतु, या तक्रारी सोडवण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
असे होते तक्रारींचे निवारण
पीएमपीची हेल्पलाइन सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते. या कक्षात १२ कर्मचारी कार्यरत आहेत. कंट्रोल रूममध्ये आलेल्या तक्रारी संबंधित आगाराकडे पाठवल्या जातात. त्यात आगार स्तरावर (तृतीय स्तर) तक्रार सुटली नाही, तर ती दुय्यम स्तरावर सहव्यवस्थापकीय संचालकांकडे जाते. तेथेही न सुटल्यास पीएमपीचे अध्यक्ष स्वतः लक्ष घालून तक्रार सोडवतात.सर्वाधिक नोंद झालेल्या तक्रारी
१ जानेवारी ते ७ डिसेंबर पर्यत जवळपास वर्षभरात प्राप्त तक्रारीचे माध्यम
व्हॉट्सॲप : १५,४६२
वेबसाईट : १३,३०७
कॉल सेंटर : ४५१०
ई-मेल : ९६९
एसएमएस : ५८०
इंस्टाग्राम : ६
फेसबुक : ५
मोबाईल ॲप : ४
तक्रारीचे प्रकार आणि संख्या
तक्रारीचा प्रकार संख्या
चालक व वाहक संबंधित तक्रारी ८९५९
मोबाईल अॅहप / संकेतस्थळ संबंधित तक्रारी ६५९३
चालक व वाहक संबंधित तक्रारी (भाडे तत्त्वावरील बसेस) ६२३७
सूचना व प्रशंसापत्रे ५०२७
सूचना व प्रशंसापत्रे ५०२७
पीएमपीएमएल बस देखभाल तक्रारी ९६२
भाडे तत्त्वावरील बस देखभाल तक्रारी ७९१
बसथांबा संबंधित तक्रारी ६०६
इतर १,२८२
एकूण तक्रारी : ३४,८४३
पीएमपीएकडे ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या सर्व तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. पीएमपीने दहा ते अकरा लाख प्रवासी प्रवास करतात. या तुलनेत या तक्रारी खूप कमी आहेत. तक्रारी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
सतीश गव्हाणे,
जनरल मॅनेजर, पीएमपी
येथे तक्रार करावी
दूरध्वनी क्रमांक
०२०-२४७५४५४५४
एसएमएस, मोबाईल, व्हाट्सअप क्रमांक
९८८१४९५५८९.
ई-मेल आयडी
complaints@pmpmi.org
संकेतस्थळ
www.pmpml.org