Pimpri News: हिंजवडीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित परिसराची (दि. १ जुलै) पाहणी करून अतिक्रमण, अडथळा आणि प्रवाह बदललेल्या ओढ्यांविरोधात त्वरित कारवाईचा इशारा दिला होता.
पिंपरी: पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आयटी हब असलेल्या हिंजवडी आयटी पार्कचा परिसर अक्षरशः ‘वॉटर पार्कमध्ये रूपांतरित झाला. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सचल्याचे समोर आले. त्यामुळे या पुरसदृश परिस्थितीनंतर अखेर प्रशासनाला जाग येत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)*च्या निरीक्षणात नाले बुजवून अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रकार आढळून आले असून, या पार्श्वभूमीवर आठ जणांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात चार जागामालक आणि त्या जागांवर व्यवसाय करणारे असे आठजण आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि जल प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या गुन्ह्यांची तीव्रता कमी असल्यामुळे अटक टाळण्यात आली असून, अटक झाली तरी लगेच जामिनावर सुटका होण्याची शक्यता आहे.
या कारवाईपूर्वीच पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित परिसराची (दि. १ जुलै) पाहणी करून अतिक्रमण, अडथळा आणि प्रवाह बदललेल्या ओढ्यांविरोधात त्वरित कारवाईचा इशारा दिला होता. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांना नोटिसा बजावून नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याचे निर्देश दिले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रवाह खुला न करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले. यापैकी एका गुन्ह्यात शशिकांत साखरे (जागामालक) आणि विठ्ठल मोनाजी तडकेवार (विकसक – गुरुकृपा बॅंगल स्टोअर) हे आरोपी आहेत.
हिंजवडीतील नागरिक समस्या आणि राजकीय मागण्या
हिंजवडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमण, वाहतूक कोंडी आदी समस्या गंभीर बनल्या आहेत. त्यामुळे हिंजवडीसह माण, मारुंजी व इतर सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. आयटी क्षेत्रातील नागरिकांनी या मागणीसाठी सह्यांची मोहीमही सुरू केली आहे. या मागणीला आमदार महेश लांडगे व आमदार शंकर जगताप यांचा पाठिंबाही मिळालेला आहे.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचा इशारा महेश लांडगे यांनी दिल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईला वेग आला असल्याचे चित्र आहे.
मुख्य मुद्दे
नाले बुजवून बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
८ जणांविरोधात पर्यावरण आणि जलप्रदूषण कायद्यांतर्गत कारवाई
नैसर्गिक प्रवाह रोखल्याने आयटी पार्कमध्ये पूरसदृश स्थिती
हिंजवडी व सात गावांचा पीसीएमसीत समावेश करण्यासाठी आयटीएन्सकडून मोहीम
आमदार लांडगे व जगताप यांचा पाठिंबा
Web Title: Pmrda take action against illegal construction in hinjewadi