
पुणे शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार? प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष
पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आणि एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीवापरात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली. यापूर्वीही पावसाला विलंब झाल्यामुळे १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर ही कपात मागे घेण्यात आली होती.
दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याची बचत करण्यासाठी विविध नियम जाहीर केले होते. बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, जलतरण तलाव भरण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, गळती तातडीने दुरुस्त करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय आज?
दिवाळीनंतर शहरात एक दिवसाआड किंवा आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार होता. सोमवारी नियोजित असलेली ही बैठक स्थगित करण्यात आली. आता ती आज मंगळवारी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पाणीकपातीचे स्वरूप निश्चित होण्याची शक्यता असून, सध्याची दर गुरुवारची कपात कायम ठेवायची की त्याऐवजी अधिक कठोर पर्याय स्वीकारायचा, याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.
1. पुण्यात सध्या पाणीपुरवठ्यावर काय निर्बंध आहेत?
१५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.
2. पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे का?
सध्या असा निर्णय झालेला नाही. मात्र, आगामी काळातील पाणीसाठा आणि पावसाची स्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष आहे.
3. पाणीकपातीचे कारण काय आहे?
एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि आगामी काळात कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.