
Pune Navaratri 2026
श्री चतु:शृंगी देवी मंदिर
सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी देवी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता श्रीधर अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होणार असून, देवीला मंगलस्नान, पंचामृत आणि सुगंधी द्रव्यांचा अभिषेक करून महापूजा केली जाईल. दररोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता पारंपरिक वाद्यांच्या साथीने महाआरती होणार आहे. महिला मंडळांतर्फे श्रीसूक्त, ललितासहस्रनाम आणि देवीच्या स्तोत्रांचे पठण होईल. १७ ऑक्टोबरला ‘आजीबाईंचा भोंडला’, तर २० ऑक्टोबरला नवचंडी होम आणि सीमोल्लंघनासाठी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
Navratri 2026: नवरात्रीत कलश स्थापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या योग्य पद्धत आणि नियम
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित दोन टप्पे पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी दोन लिफ्ट उभारण्याचे नियोजन आहे. दर्शनरांगांसाठी बॅरिकेडिंग, ऑनलाइन दर्शन पास, विनामूल्य वाहनतळ, सीसीटीव्ही आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
श्री भवानी देवी मंदिर, भवानी पेठ
भवानी पेठेतील श्री भवानी देवी मंदिरात ११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता घटस्थापना होणार असून, महाअभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात महिला भजनी मंडळांचे कार्यक्रम, कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रम होतील. १९ ऑक्टोबरला नवचंडी हवन, तर २० ऑक्टोबरला विजयादशमीनिमित्त शमीपूजन, शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन होईल. २५ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महापूजा होणार आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग
सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होईल. सायंकाळी सहा वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे. ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित सजावट आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून, देवीला दोन किलो वजनाचा नक्षीकाम केलेला सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे.
वनदेवी मंदिरात घटस्थापनेला मिरवणूक आणि देवीची महापूजा
दरवर्षीप्रमाणे यंदाही घटस्थापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ८.३० ते ११ या वेळेत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत देवीची पूजा आणि घटस्थापना होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भजन, कीर्तन, देवीची महापूजा तसेच होमहवन असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर दिवसभर खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वनदेवी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी अण्णा बराटे यांनी दिली.
तळजाई मंदिरात घटस्थापनेची मिरवणूक
तळजाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी, रविवारी सकाळी ८.३० ते ११ या वेळेत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी एक या वेळेत देवीची पूजा करून घटस्थापना केली जाईल. उत्सवकाळात मंदिरात भजन, कीर्तन, महापूजा आणि होम-हवन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार असल्याची माहिती दिली आहे.
Navratri 2026: कुठे गरबा-दांडियाची धूम, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अशा आहेत वेगवेगळ्या परंपरा
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात सकाळी सात वाजता घटस्थापना
पुण्याची ग्रामदेवता असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी सकाळी सात वाजता घटस्थापना होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात पारंपरिक पद्धतीने विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
श्री काळी जोगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सव
बुधवार पेठेतील श्री काळी जोगेश्वरी मंदिरात पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. उत्सवकाळात दररोज सकाळी देवीची पूजा, सप्तशती पाठ, श्रीसूक्त पठण, जप, जोगवा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.