
pune ganeshotsav 2026
शहरातील मध्यवर्ती पेठांसह विविध भागांतील गणेश मंडळांनी पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर जिवंत देखावे साकारले आहेत. कांतारा, रावणवध, ‘इथे ओशाळला मृत्यू’, मल्हार-बानू विवाह, ‘गड आला पण सिंह गेला’ यांसह विविध विषयांचा त्यात समावेश आहे. सदाशिव पेठेतील टिळक चौक येथील गणेश मित्र मंडळाने श्रीकृष्ण-सत्यभामा आणि नरकासुर युद्धाचा देखावा साकारला असून, त्यामध्ये पुतळ्यांच्या हालचालींसाठी यांत्रिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
जिवंत देखाव्यात प्रत्यक्ष रंगमंचावर साकारता न येणारे युद्धदृश्य, ऐतिहासिक स्थळे किंवा वातावरणनिर्मिती पडद्यावर एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या चित्रफितींद्वारे दाखविली जात आहे. हत्ती गणपती मंडळानेही देखाव्याच्या मागील बाजूस एलईडी पडदा लावून एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अभिनय आणि पडद्यावरील दृश्ये यांचा मेळ साधला जात आहे.
पुतळे किंवा मूर्ती वर-खाली करण्यासाठी वजन आणि हालचालीच्या प्रकारानुसार हायड्रॉलिक यंत्रणा किंवा इलेक्ट्रिक स्क्रू जॅकचा वापर केला जात आहे. हायड्रॉलिक यंत्रणेत तेलाच्या दाबाने जॅक कार्यरत होऊन पुतळ्याची हालचाल हळुवारपणे केली जाते. लहान किंवा मध्यम आकाराच्या देखाव्यांमध्ये मोटरच्या साहाय्याने स्क्रू फिरविणाऱ्या इलेक्ट्रिक स्क्रू जॅकचा वापर केला जात आहे. यंदा अशा यंत्रणांचा वापर करून अनेक देखावे उभारण्यात आले आहेत. नवनवीन आणि आकर्षक देखाव्यासाठी शनिपार मंडळ नेहमीच चर्चेत असते. या वर्षी मंडळाने आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोजेक्शनचा वापर करत पर्यावरणपूरक असा ‘शंभाला’ हा देखावा साकारला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड यांनी सांगितले.
एआयमुळे देखाव्यांसाठी डिजिटल पार्श्वदृश्य तयार करणेही सोपे झाले आहे. मोबाईलवरील विविध एआय आधारित अनुप्रयोगांच्या मदतीने मंडळातील कार्यकर्ते स्वतःच चित्रफिती तयार करत आहेत. दोन प्रसंगांमधील दुवा साधणे, पार्श्वभूमी तयार करणे किंवा एखादा मोठा प्रसंग काही क्षणांत दाखविण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर मंडळांनी समाजमाध्यमांसाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. आरती, देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चित्रफिती, छायाचित्रे आणि रील्सच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे क्षण जगभरातील भाविकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. त्यामुळे पारंपरिक जिवंत देखाव्यांसोबतच डिजिटल माध्यमांचाही उत्सवाच्या सादरीकरणात ठळकपणे प्रवेश झाला आहे.