
दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे : रस्ते, स्वच्छता, कचरा, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसह नागरिकांच्या विविध समस्यांच्या निराकरणातील दिरंगाई आता पुणे महापालिका अधिकाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तक्रारी दाखल होऊनही त्यांचे वेळेत निराकरण होत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांना आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन पाहणी करावी लागणार आहे.
या पाहणीदरम्यान स्वच्छता, रस्ते, सांडपाणी वाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवांची स्थिती तपासली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या इतर समस्या आणि प्रशासनातील त्रुटींची नोंद घेऊन त्यांच्या निराकरणाची कालमर्यादा निश्चित करावी लागणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर सोडविता येणाऱ्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या मुख्य विभागाशी संबंधित किंवा मुख्यालयाची मंजुरी आवश्यक असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागप्रमुखांकडे तातडीने पाठवावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी केवळ पत्रव्यवहार आणि फाइलांमध्ये प्रलंबित राहू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांना पाठपुरावा करावा लागणार आहे.
फोटो आणि व्हिडीओ बंधनकारक
समस्या सोडवल्यानंतर प्रत्यक्षात काम झाले की नाही, याची खात्री करण्यासाठी ‘आधी आणि नंतर’चे फोटो अथवा व्हिडिओ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कारवाईपूर्वीची स्थिती आणि काम पूर्ण झाल्यानंतर झालेला बदल स्पष्टपणे नोंदविला जाणार आहे.
दर सोमवारी आयुक्त घेणार समस्यांचा आढावा
दर सोमवारी सकाळी आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या समस्यांबाबत आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला परिमंडळ उपायुक्त, सहायक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. तसेच साप्ताहिक पाहणी आणि त्यावरील कार्यवाहीचा क्षेत्रीय कार्यालयनिहाय व परिमंडळनिहाय अहवाल दर शुक्रवारी आयुक्त आणि संबंधित अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. यासाठी स्वतंत्र गूगल शीट तयार करण्यात येणार असून, त्यात पाहणी, आढळलेल्या समस्या आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती नोंदवावी लागणार आहे.