पुणे पोलिसांकडून 2038 पर्यंतचे नियोजन; वाहतुकीचा वेग कसा वाढणार?
पुणे/अक्षय फाटक : पुणे शहरात दररोज वाढणारी वाहन संख्या आणि इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील रस्त्यांची असलेली संख्या लक्षात घेत पुणे पोलिसांनी वाहतूक नियोजन आखले आहे. पुढच्या बारा वर्षात वाहन संख्या १ कोटींच्या घरात पोहचेल. त्यामुळे कोंडी अधिकच गंभीर रूप धारण करणार आहे. त्यानूसार पोलिसांनी नियोजन आखले असले तरी त्याला एकत्रित सहभाग आणि पायभूत सुविधा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे हा उपाय उत्तर म्हणून असणार आहे. पुणे पोलिसांनी या कोंडीतून पुणेकरांना मुक्तता देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानूसार २०३८ पर्यंतचे प्लॅनिंग आखले आहे.
पुण्याच्या भूभागावर केवळ ७ टक्के रस्ते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या वाहतूक नियोजनपर एक आराखडा मांडला. त्यात पुण्याची सद्यस्थिती, सध्या केले जात असलेले उपाय तसेच पुढील वाहतूक स्थिती व आवश्यक उपाययोजना याची इत्थंभूत माहिती दिली आहे. पुण्याच्या भूभागानुसार केवळ ७ टक्केच रस्ते आहेत. वास्तविक शहराच्या भूभागाप्रमाणे १५ टक्के रस्ते असावे लागतात. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात ते सर्वाधिक कमी आहे. त्यामुळे पुण्याला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सध्या ही स्थिती आहे, पण भविष्यात ही स्थिती आणखी भयावह होणार आहे. पुणे पोलिसांच्या अंदाजानुसार ५८ लाख वाहने नोंदणीकृत आहेत. २०३७ पर्यंत ही संख्या दुप्पट होऊन १ कोटीवर जाण्याचा अंदाज आहे. ही फक्त नोंदणीकृत संख्या आहे. वास्तविक बाहेर शहर व राज्यातून आलेली वाहन संख्या वेगळीच आहे, जी नोंदणीकृत नाही.
२०११ साली ४३ लाख लोकसंख्येच्या तुलनेत ४८ लाख वाहने होती. २०२५ मध्ये लोकसंख्या ५८ लाख आहे, वाहनसंख्या ५८ लाखांवर पोहोचली आहे. पुढील काळात वाहन वाढीचा वेग कायम राहिल्यास २०३७ मध्ये ९३ लाख लोकसंख्या आणि १ कोटी १२ लाखांवर वाहनसंख्या जाईल.
सरासरी वेग घटतोय…
वाहनांच्या प्रचंड वाढीमुळे रस्त्यांवरील सरासरी वेग सतत घटत आहे. २०११ मध्ये २६ किमी प्रतितास सरासरी वेग होता. आता २०२५ मध्ये १९ किमी प्रतितासावर आला आहे. २०३७ मध्ये हा वेग केवळ १२ ते १४ किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या उपायांची आवश्यक्ता
पुणेकरांना वाहतूकीतून मोकळीक देण्यासाठी काही अंगभूत उपायांची गरज आहे. अंगभूत बस मागणी पुरवठा, सिग्नल सिंक्रोनायझेशन, स्वतंत्र सायकल मार्ग, स्मार्ट ट्रॅफिक कंट्रोल, बस व मेट्रोचा विस्तार, ‘पार्क अँड राईड’ सुविधा, तसेच ‘फीडर सर्व्हिस’चा समावेश पोलिसांनी सूचवला आहे.
पुणे महानगर क्षेत्रात सध्या २ हजार किमी रस्ते नेटवर्क आहे. तर २ हजार सार्वजनिक बस, आणि ३३.१ किमी मेट्रो लाईन कार्यरत आहेत. या पायाभूत सुविधांचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करूनच वाढत्या वाहनसंख्येचा ताण कमी करता येणार आहे, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.