पुणे: दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचे, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यावर आता पुण्यातील शिवसैनिक अशोक हरणावळ यांनी नीलम गोऱ्हे यांनी आरोप करणे थांबवावे, अन्यथा नीलम ताई माझ्याकडे तुमची पूर्ण कुंडली असून, लवकरच भांडाफोड केला जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
वादग्रस्त वक्तव्यानंतक पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थाना बाहेर काल ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आणि नीलम गोऱ्हे यांनी नाक घासून उद्धव ठाकरे यांची माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
श्रद्धास्थानांना आरोप सहन करणार नाही
ठाकरे गटाचे महापािलकेतील माजी गटनेते अशोक हरणावळ यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,” शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राज्यभरात लाखो शिवसैनिक घडले आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. यापैकी मी एक असून उद्धव ठाकरे यांनी मला नगरसेवक, गटनेता होण्याची संधी दिली. पण ज्यावेळी नीलम गोऱ्हे या पुणे जिल्ह्याच्या संपर्क नेत्या होत्या. त्यावेळी नीलम गोऱ्हे या महापालिकेच्या प्रत्येक कामकाजात हस्तक्षेप करीत असत, कोणाच्या विरोधात सभागृहात प्रश्न विचारायचा, कोणाला अडचणीमध्ये आणायाचे, त्यावेळी अर्थकारण कसे करण्यात आले. हे मला माहिती आहे. त्यामुळे आमचे श्रध्दास्थान उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणे बंद नाही केल्यास मी कुंडली उघड करु असा इशारा दिला आहे.
ठाकरे गटावर नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप
शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हतं,” असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.
“दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”; ठाकरे गटावर नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप
पुढे त्या म्हणाल्या की, “२०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता. पण आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयासाठी भेट मिळणार नाही, दोन ते तीनवेळा आरटीपीसीआर केली तरीही भेट मिळणार नाही. यानंतर प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतरं होतात ती काही मुदपाक खान्याच्या विश्लेषणातून होत नाहीत. एकनाथ शिंदे यांना नुकताच महादजी शिंदे पुरस्कार मिळाला आहे. ते या सगळ्यावर बोलतील,” असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.