नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटामध्ये 2 मर्सिडिज देत पद मिळण्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचा एकतर्फी विजय झाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये वादविवाद देखील होताना दिसत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाला मोठी गळती लागली असल्याचे देखील दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून महायुतीमध्ये सामील झाले आहेत. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हतं,” असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “२०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता. पण आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयासाठी भेट मिळणार नाही, दोन ते तीनवेळा आरटीपीसीआर केली तरीही भेट मिळणार नाही. यानंतर प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतरं होतात ती काही मुदपाक खान्याच्या विश्लेषणातून होत नाहीत. एकनाथ शिंदे यांना नुकताच महादजी शिंदे पुरस्कार मिळाला आहे. ते या सगळ्यावर बोलतील,” असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत धक्कादायक विधान केले. दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, “मला आमदारकी मिळावी म्हणून संजय राऊत यांनी प्रयत्न केले. मी काहीच दिले नाही. मला एक रुपया पक्षाने मागितले नाही. त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ऋणी आहे. माझ्यासारखे अपवाद सोडले तर या गोष्टी घडत होत्या. व्यक्ती म्हणून उद्धव साहेब संस्कृत नेते आहे. परंतु त्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही. ते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत,” असे स्पष्ट मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.