
Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी शहरात जोरदार हजेरी लावली. मात्र, बुधवारी (ता. २३) शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेत केवळ ढगाळ वातावरण राहिले. शहरात बुधवारी कमाल तापमान ३० अंश, तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारी (ता. २४) कमाल तापमान ३०, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस दिसून आले.
पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे गुरुवारी विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात पुन्हा पावसाच्या सरींची शक्यता कायम आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने राहण्याची शक्यता आहे. तसेच या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात धाराशिव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर प्रचंड कमी पाऊस पडला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव, कोल्हापूरला पावसाचा यलो अलर्ट
सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.