
rebellion within BJP candidate Vilas Madegiri family his son Abhishek contesting against
PCMC Political News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेत दीर्घकाळ नगरसेवक म्हणून प्रभावी भूमिका बजावलेल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विलास मडेगिरी यांच्या कुटुंबातूनच बंडखोरी उफाळून आली आहे. विलास मडेगिरी यांचे सुपुत्र अभिषेक यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. वडिलांना मिळालेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारीला मुलाने आव्हान दिल्याने भाजपला चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.
या घटनेमुळे संबंधित पक्षात अंतर्गत तणाव निर्माण झाला असून, निवडणुकीच्या रिंगणातच राजकीय वादळ उठले आहे. वडिलांचा स्पष्ट विरोध असतानाही पुत्राने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षशिस्त, नेतृत्व आणि कौटुंबिक निष्ठा या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच ‘बंडखोर पुत्र’ अभिषेक हा काही दिवस फोनवर कोणालाही उपलब्ध नव्हते. त्यामुळे हे बंड अचानक झाले नसून, हा कौटुंबिक मतभेदातून आलेला पूर्वनियोजित निर्णय असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे देखील वाचा : खासदार संजय राऊत अन् DCM एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
दरम्यान, संबंधित ज्येष्ठ नेत्यांनी खुलासा करताना “मुलाला अर्ज मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया आणि वेळेचे भान राहिले नाही,” असे सांगितले. मात्र, तब्बल १५ वर्षे महापालिकेच्या सत्ताकेंद्रात असलेल्या नेत्याच्या घरात वाढलेल्या मुलाला अर्ज मागे घेण्याची साधी प्रक्रिया माहित नसावी, हे स्पष्टीकरण आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाची अर्ज भरण्याची प्रक्रिया (फॉर्म ए, बी, प्रतिज्ञापत्र, सूचक, अनुमोदक) ही माघारीपेक्षा कितीतरी क्लिष्ट असते. ती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला माघारीची प्रक्रिया माहित नव्हती, असे म्हणणे म्हणजे मतदारांच्या बुद्धिमत्तेचा अपमान असल्याची टीका होत आहे.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
मडेगिरी यांना घरातून होणारा विरोध ही काही पहिलीच वेळ नाही. आता मुलाने थेट वडिलांच्या समोर उमेदवारी अर्ज दाखल करत आव्हान दिले आहे. विलास मडेगिरी यांचे कमळ चिन्ह असून अभिषेक मडेगिरी यांचे ट्यूब लाईट चिन्ह आहे. या सर्व घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात पक्षांतर्गत एकता, नेतृत्वाची विश्वासार्हता आणि कौटुंबिक संबंधांचा राजकारणावर होणारा परिणाम याबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा वाद संबंधित पक्षासाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.