
आता अवघ्या अर्ध्या तासात मिळणार 'शालार्थ आयडी'; हेलपाटे मारणे होणार कमी
पूर्वी खासगी शाळांमध्ये शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर संबंधित शाळेकडून नियुक्ती आणि रुजू अहवालाचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला जात असे. त्यानंतर वेतन पथक, शिक्षणाधिकारी आणि आवश्यकतेनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. कनिष्ठ महाविद्यालयांच्या बाबतीत पुढील स्तरावरही प्रस्ताव पाठवावा लागत असे. या संपूर्ण प्रक्रियेत अनेक महिने जात असल्याने शिक्षकांना वेतन सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नियुक्ती आदेश उमेदवाराच्या लॉगिनवरच उपलब्ध
पवित्र पोर्टलवरून निवड झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी शिक्षणाधिकारी स्तरावर होईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संस्थेला नियुक्ती आदेश देता येईल. हा नियुक्ती आदेश उमेदवाराच्या लॉगिनवरच उपलब्ध होणार असून, त्याला तो डाउनलोड करता येईल. नियुक्ती आदेशानुसार शिक्षक शाळेत रुजू झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा संबंधित शाळा प्रशासनाला पोर्टलवर रुजू झाल्याची माहिती भरावी लागेल. त्यासोबत शिक्षकाच्या बैंक खात्याचा तपशील आणि वारसदाराची माहिती नोंदवावी लागेल. ही माहिती पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत शालार्थ आयडी तयार होईल.
मंजुरीसाठी होणारी प्रतीक्षा कमी होणार
शाळेच्या नियमित वेतन पोर्टलवर मुख्याध्यापकांच्या लॉगिनमध्ये संबंधित शिक्षकाची नोंद नवीन कर्मचारी म्हणून दिसणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना वेतन देयक तयार करताना संबंधित शिक्षकाची माहिती समाविष्ट करता येईल. पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत त्याचे वेतनही काढता येणार आहे. यामुळे कागदपत्रांची ने-आण, कार्यालयीन हेलपाटे आणि मंजुरीसाठी होणारी प्रतीक्षा कमी होऊन नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेळेत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
1. शालार्थ आयडी किती वेळात मिळणार आहे?
पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त झालेल्या शिक्षकाने शाळेत रुजू झाल्यानंतर आवश्यक माहिती ऑनलाइन भरल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात शालार्थ आयडी तयार होणार आहे.
2. शालार्थ आयडीसाठी कोणती माहिती नोंदवावी लागणार आहे?
शिक्षकाची आवश्यक माहिती, बँक खाते आणि वारसदाराची माहिती ऑनलाइन नोंदवावी लागणार आहे.
3. शालार्थ आयडी तयार झाल्यानंतर काय होणार आहे?
संबंधित शिक्षकाची नोंद शाळेच्या वेतन प्रणालीत उपलब्ध होणार आहे.