
महिलांना साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? सुरेखा ढवळे यांचा विरोधकांना सवाल
पुरंदर तालुक्याला जनतेच्या विकासाचा ध्यास घेतलेला नेता हवा आहे. सामान्य नागरिकांच्या हाताला काम पाहिजे, गावोगावचे रस्ते सुधारले पाहिजेत, यासाठी भाजपचे सरकार कटिबद्ध आहे. मागील पंच वार्षिक निवडणुकीत जनतेने तुम्हाला निवडून दिले. मात्र पाच वर्षात कुठेही दिसला नाही. काही जण फुकटची सहानुभूती मिळविण्यासाठी दशक्रियाविधी आणि अंत्यविधी कार्यक्रमात भाषणे करीत राहिले तर दुसरीकडे महिलांना साड्या वाटप करून आणि जेवणावळी घालून मते घेण्यासाठी आटापिटा केला जात आहे. त्यामुळे विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेले लोक साड्या वाटप करून विकास करणार का ? असा सवाल प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केला आहे.
गावातील महिलांनी यावेळी भाजप उमेदवारांचे जागोजागी जल्लोषात स्वागत केले. अनिता कटके, रुपाली कटके, मंदाताई गायकवाड, मंगल गायकवाड, पुष्पाताई गायकवाड, छबुबाई लिंभोरे, संग्राम कटके, रेश्मा कटके विठ्ठल चौधरी, नितीन कटके, भाऊसो कटके, आशाताई काळे यांच्यासह गराडे गणातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिव्या जगदाळे यांनी सांगितले की, मी आज एका गटातून निवडणूक लढवीत आहे. मात्र कामे संपूर्ण तालुक्यासाठी करायची आहेत. तालुक्यातील महिला त्यांच्या स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभ्या राहिल्या पाहिजेत, यासाठी त्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट आहे. माझे वडील गंगाराम जगदाळे जवळपास वर्षानुवर्षे समाजासाठी झटत असून, तोच वारसा मला पुढे न्यायचा आहे. त्यासाठी आपण मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन जगदाळे यांनी केले आहे.
भिवरी गणातील भाजपच्या उमेदवार ललिता कटके यांनी सांगितले की, मी तुमच्यासमोर मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आले आहे. मला जनतेचे मालक नाही तर जनतेचे सेवक म्हणून काम करायचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाची वाटचाल सुरु आहे. अनेक पिढ्या महिलांना चुलीला सरपण शोधण्यात गेल्या, मात्र मोदी साहेबांनी गोरगरिबांना अनेक योजना दिल्या, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली. आजही शेतकऱ्यांना दरमहा थेट खात्यावर सन्मान निधीतून आर्थिक मदत केली जाते. तोच विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून घरोघरी पोहोचवायचा आहे, अशी भावना ललिता कटके यांनी व्यक्त केली आहे.