
राजकीय घडामोडींना वेग, जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय घराणेशाही; सांगलीत नेमकं काय घडतंय?
सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी निवडणूक होत आहे, यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे महिला राखीव असल्याने अनेक प्रस्थापित राजकीय घरातून महिलांना निवडणुकीची उमेदवारी दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद ही तशी कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी पाहिली जाते, मात्र अनेक वर्षे नेत्याची सेवा करून देखील अचानक आमदार आणि खासदारांच्या घरातील वारसांचे राजकीय बस्थान बसवण्यासाठी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देवून शांत बसवत घराणेशाहीच चालवली जात असल्याचे चित्र आहे. आपल्या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी जवळच्या कार्यकर्त्यांपेक्षा आता घरातील सदस्यांवर विश्वास ठेवला जात आहे.
भाजपचे शिराळा विधानसभा मतदार संघाचे आमदार सत्यजित देशमुख यांची कन्या साईतेजस्वी देशमुख या कोकरूड गटातून निवडणूक लढत आहेत. भाजपकडून आमदार आणि खासदार यांच्या घरात उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने साईतेजस्वी या जनसुराज्य पक्षातून निवडणूक लढत आहेत, मात्र हाच नियम पडळकर यांना का लागू नाही याचे उत्तर भाजपच्या संघटनात्मक पदाधिकारी यांच्याकडून मिळाले नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे सम्राट महाडिक यांचे बंधू माजी जिल्ह परिषद सदस्य राहुल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक या पारंपारिक येलूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या घरातून उमेदवारी आहे.
सी.बी.पाटील यांचे चिरंजीव जयराज पाटील हे कामेरी मतदार संघातून निवडणूक लढतील. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या वाहिनी आणि अमोल बाबर यांच्या पत्नी शीतल बाबर या नागेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढत आहेत. माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणूक लढत आहेत. त्यांच्याच घरातून अक्षय पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आमदार अरुण लाड यांच्या सून आणि भाजपचे नेते शरद लाड यांच्या पत्नी पूजा शिंदे या कुंडल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढत आहेत.
पडळकर घराणेशाहीवर बोलणार कसे ?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजकारणात पाऊल ठेवतानाच माझा लढा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे, असे सांगत राज्यातील सर्वच राजकीय घराणेशाहीवर टीका केली. शरद पवार ते जिल्ह्यातील वसंतदादा घराण्यापर्यंत त्यांनी टीका केली आणि तुम्हाला, तुमच्या मुलाला, तुमच्या नातवाला अजून किती पिढ्या आम्ही निवडून द्यायचे असे सवाल केले. घराणेशाही विरोधात नेहमी त्यांनी भूमिका घेतली, त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांना पाठींबा वाढला, त्यातून त्यांची राजकीय घडी बसवत ते स्वत: आमदार झाले. बंधू जिल्हा परिषदेला सभापती झाले. वयस्कर आई सरपंच झाल्या, आता त्यांनी त्यांच्या वाहिनी माधवी पडळकर यांना निंबवडे जिल्हा परिषद गटातून उमेदवार केले आहे, त्यामुळे विस्थापितांचे नेते असणारे गोपीचंद पडळकर स्वत: प्रस्थापित झाले, मात्र आता ते घराणेशाहीवर बोलणार कसे असा सवाल लोक विचारू लागले आहेत.
कदम घरण्यातून तीन उमेदवार
सांगली जिल्ह्यात वसंतदादा घरण्यानंतर प्रस्थापित घराणे म्हणजे दिवंगत पतंगराव कदम, याच कदम घराण्यात यावेळी पहिल्यांदा तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, यामध्ये डॉ. विश्वजीत कदम यांचे पुतणे भाचे ऋषिकेश लाड हे पारंपारिक कुंडल गटातून उमेदवार आहेत, माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू दिग्विजय कदम हे चिंचणी जिल्हा परिषद गटातून उभे आहेत. तर डॉ. विश्वजीत कदम यांचे पलूस आणि कडेगाव मधील कामे बघणारे जितेश कदम हे हिगणगावमधून निवडणूक लढत आहेत. असे एकूण तीन उमेदवार एका कदम घरातून या निवडणुकीत आहेत.
अध्यक्षपदासाठी रणनीती
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असल्याने प्रस्थापित राजकीय घराण्यातील नेत्यांना अध्यक्षपदाची आस लागली आहे. कोणत्याही स्थितीत पहिली अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याच घरातील महिलेला मिळायला हवे यासाठी निवडणुकीत रणनीती आखली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आणि ग्रामीण भागातील विकास कामासाठी अधिकार असल्याने यातूनच विधानसभेचा मार्ग खुला होतो असा समज असल्याने अनेक राजकीय कार्यकर्ते विधानसभेसाठी पहिली पायरी म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे, त्यात काही वर्षात राजकीय क्षेत्रात पन्नास टक्के महिला आरक्षणाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय घराणे कामाला लागली आहेत.