पोलीस अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धक्काबुक्की, छावा संघटनेचा आरोप; आंदोलनाचाही दिला इशारा
पिंपरी : हिंजवडी पांडवनगर येथे अतिक्रमणाबाबत चर्चा सुरू असताना हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पी आय) बालाजी पांढरे यांनी शेतकरी बांधवांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुपारी साधारण २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत शेतकरी, पीएमआरडीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक अतिक्रमणाच्या मुद्यावर चर्चा करत होते. त्याचवेळी वरिष्ठ पांढरे यांनी चर्चेत हस्तक्षेप करून काही शेतकऱ्यांना ढकलले आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे.
छावा संघटनेचा निषेध व इशारा
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे यांनी सांगितले की, “वरिष्ठ पीआय पांढरे यांचे वर्तन अशोभनीय असून, हा पोलिस बळाचा गैरवापर आहे. पीएमआरडीचा कारभार शेतकऱ्यांना हानी पोहोचवणारा आणि बिल्डर लॉबीला पोषक आहे. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून निर्णय घ्यावा.”
गृहमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी
मोरे यांनी पुढे सांगितले की, नुकतेच त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना निवेदन दिले असून, कारवाई न झाल्यास छावा संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते विजय घाडगे पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शांतपणे चर्चा सुरू असताना वरिष्ठ पी आय पांढरे यांनी शिवराळ भाषेत बोलणे हे गंभीर वर्तन आहे. गृहमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी.”
आंदोलनाचा इशारा
संघटनेने स्पष्ट केले की, दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल. पत्रकार परिषदेत प्रदेश महासचिव मनोज आण्णा मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, शिक्षक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत फडसर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर तसेच अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
छावा संघटना आक्रमक
गेल्या काही दिवसाखाली लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. यानंतर छावा संघटनेनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.