
पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली 'ही' मागणी
पुणे : डॉ. होमी भाभा (पाषाण) रस्त्यावरील सेंट जोसेफ स्कूल, लॉयला स्कूल व पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर विद्यालयाजवळील स्टील बसथांबा सोमवारी कोसळला. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या हलक्या स्वरूपाच्या पावसात अचानक हा बसथांबा कोसळला. हा बसथांबा शाळांच्या परिसरात असून या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने घटना घडली त्यावेळी शाळा सुटण्याची वेळ नसल्याने तसेच पावसामुळे रस्त्यावर नागरिक व विद्यार्थी कमी असल्याने मोठी जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना टळली. मात्र, या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. पुणे शहरातील सर्व ‘पीएमपीएमएल’ बसथांब्यांची सुरक्षितता तपासण्याची मागणी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुण्यातील धोकादायक अथवा कमकुवत आढळणारे बसथांबे तातडीने दुरुस्त अथवा पुनर्बाधणी करावेत. काही दुर्घटना घडल्यास आम्ही प्रशासनास जबाबदार धरू व ‘मनसे स्टाईल’ आंदोलन केले जाईल, असा इशाराही सुहास निम्हण यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. संचालक यांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निलेश जुनवणे, जयदेव चव्हाण, अंकित पवार, सज्जन नरवडे, किशोर इंगवले, व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा – मनसे
पुणे मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची एक महत्वाची मागणी गेल्या काही दिवसाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बारामती बसस्थानकाचा ज्या धर्तीवर अत्यंत आधुनिक, देखणा, हायटेक आणि सर्वसुविधांयुक्त कायापालट केला आहे. ते आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वास्तू आहे. दादांच्या याच दूरदृष्टीचा आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून पौड येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करणे सहज शक्य आहे, असे निम्हण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई