समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती
पुणे/प्रगती करंबेळकर : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी दिलेल्या लाकडी मुर्तीची परंपरा कायम ठेवत कोथरूडचा समस्त गावकरी मंडळाचा गणपती, ज्याला ‘ग्राम गणपती’ म्हणून ओळखले जाते, यंदा ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. १९४४ साली स्थापन झालेल्या या ऐतिहासिक गणेशोत्सव मंडळात यावर्षी ९० फूट उंच मूर्ती सजली असून, अयोध्येच्या भव्य मंदिराचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. कोथरूड गावातील ग्रामस्थांनी १९४४ मध्ये स्थापन केलेल्या या मंडळाला समस्त गावकरी मंडळ असे नाव पडले, कारण गावातील सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव सुरू केला होता. त्यामुळे हा गणपती केवळ एका मंडळाचा नसून, संपूर्ण गावाचा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच ‘ग्राम गणपती’ ही ओळख निर्माण झाली आहे.
स्थापनेचीही वैशिष्ट्यपूर्ण कथा
या गणपतीच्या स्थापनेमागेही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे पुण्यात आज जेथे एफटीआयआय आहे, त्या जागी स्टुडिओ होता. त्यावेळी शांताराम पुण्यात शुटिंगसाठी आले असताना, शुटिंगसाठी लागणारे साहित्य ते कोथरूडमधील गावकऱ्यांकडून घेत असत. त्यांच्या आणि ग्रामस्थांमधील जिव्हाळ्याच्या नात्यामुळेच, गावकऱ्यांनी गणपती स्थापनेची इच्छा व्यक्त केली असता, व्ही. शांताराम यांनी स्वतःच्या स्टुडिओतून लाकडी गणपतीची मूर्ती बनवून दिली. गणेशोत्सवात आजही त्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
यावर्षी मंडळात २६ ऑगस्ट रोजी अयोध्या देखाव्याचे उद्घाटन झाले असून, यामध्ये श्रीराम मंदिराचे भव्य दर्शन मंडपात सजले आहे. समस्त गावकरी मंडळ केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता, वर्षभरात रक्तदान शिबिर, अन्नदान, शिवजयंती, दहीहंडी, शिवराज्याभिषेक यांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करत असते. विशेष म्हणजे, मंडळाचे स्वतःचे २५ वर्षांपासून कार्यरत ढोल-ताशा पथक असल्यामुळे, डीजेचा वापर कमी करण्यावर त्यांचा भर असतो. यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात डीजेमुक्त वातावरण ठेवले गेले, हे याचे उत्तम उदाहरण आहे.
मंडळाचे आधारस्तंभ चंद्रकांत मोकाटे म्हणतात, समस्त गावकरी मंडळ हे कोथरूडच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. कोथरूड गावाचा उरूसही मंडळातर्फे आयोजित केला जातो. तरुणांनी पुढे येऊन अशा परंपरा टिकवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळाचे पदाधिकारी
राहुल माथुर, प्रदीप चव्हाण, चेतन मोकाटे, राजू इनामदार, शिवाजी गाढवे, हे आहेत.