पुण्यात कात्रज भागात अपघात (फोटो- istockphoto)
पुणे: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पाठिमागे बसलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर, दुचाकी चालक तरुण जखमी झाला. कात्रज भागात हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी कृष्णा श्रीवास्तव (वय २४, रा. वडाळा, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार करण प्रवीण चिकणे (वय २४, रा. दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) हा जखमी झाला आहे. चिकणे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी ट्रकचालक सागर विलास थोरा (वय २९, रा. काशीद बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार करण आणि त्याची मैत्रीण सोनी कात्रज भागातून निघाले होते. त्यावेळी गुजरवाडी फाटा परिसरात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात पाठिमागे बसलेली सोनी या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.
महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी तीन लाख ८० हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना कात्रज भगात घडली. याबाबत दिनकर सावंत (वय ५६, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांची पत्नी रविवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास कात्रज भागातील अंबिका हाॅटेलसमोर थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पिशवीतून चोरट्यांनी तीन लाख ९० हजारांचे दागिने चोरून नेले.
काही वेळानंतर त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा दागिने चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. शहरात पादचारी महिलांकडील मोबाइल संच, तसेच दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट भागातील जेधे चौकात एका तरुणीच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.
कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल
पुणे शहरातील अवैध धंद्याबाबत तंबी देऊन अन् ६५ जणांची उचलबांगडी केल्यानंतर देखील त्यांची जागा आता नव्या वसूलीदारांनी घेतली आहे. परिणामी अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असून, कात्रजमधील एका हुक्का पार्लरबाबतचा स्मरणपत्राचा एक मॅसेज सध्या पोलीस दलात प्रचंड व्हायरल होत आहे. स्मरणपत्राच्या मॅसेजमध्ये ६ वेळा हुक्का पार्लरबाबत तक्रार करूनही तो सुरूच आहे, असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्याभरापुर्वीच येथे कारवाई केली होती. तरीही तो हुक्का पार्लर सुरू असल्याचे सांगितले जाते. तत्पुर्वी नुकताच कात्रजमधील तीन पत्ती जुगारावर छापा मारून भारती विद्यापीठ पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसते.