रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
Gautami Patil Car Accident News in Marathi : नृत्यांगना गौतमी पाटील सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या कारने ३० सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षाचालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत सदर रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. अपघातानंतर अपघातस्थळावरून पळ काढलेल्या गौतमी पाटीलच्या चालकाला काही तासातच अटक करण्यात आली. दरम्यान, अपघातस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करावे आणि गौतमी पाटीलला अटक करावी, अशी मागणी अपघाग्रस्त रिक्षाचालकाच्या कुटुंबियाकडून करण्यात येत आहे.
आंदोलनानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि आपले मांडले असता पाटील यांनी थेट पोलिस उपायुक्तांना फोन केला. फोन केल्यानंतर ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही ?’ अशा थेट प्रश्न त्यांनी विचारला. अपघातग्रस्त कुटुंबाचा वैद्यकीय खर्च वाढला असून त्याबद्दल लवकर न्याय करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
३० सप्टेंबर रोजी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एक अपघात झाला. त्यामध्ये कारने रिक्षाला धडक दिली आणि वाहनचालत तेथून पळून गेला. तर रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झाला आहे. ज्या कारने धडक दिली ती गौतमी पाटील हिची होती, आणि यामुळेच आता हे प्रकरण तापलंय. याच प्रकरणी पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.
३० सप्टेंबरला झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी गौतमी पाटील यांना जबाब देण्यासाठी नोटीस बजावली आहे आणि त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज ज्या रात्री घडले त्या अपघाताचे फुटेज पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या फुटेजमध्ये काय सापडतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दोन पथकांना तपासासाठी पाठवण्यात आले आहे.तसेच अपघातावेळी गौतमी पाटील ही त्या कारमध्ये होती का, तिचं लोकेशन कायं होतं याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे, त्यामुळे आता गौतमीच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.