
पुणेछ गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि.२३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी कमी झाली. परंतु, उन्हाच्या झळा जाणवू लागल्यानंतर पपई, लिंबू व फळांसोबतच कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि करडईच्या भावात वाढ झाली आहे. शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर आणि भुईमुग शेंगाच्या भावात घसरण झाली. हिरवी मिरचीचे भाव वाढले आहेत तर उर्वरित भाज्यांची मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली़.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ ते ४ टेम्पो, राजस्थान येथून ५ ते ६ ट्रक गाजर, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो भुईमुग शेंग, हिमाचल प्रदेश १ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो तोतापूरी कैरी, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५५० ते ६०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, शेवगा ५ ते ६ टेम्पो, मटार ७०० ते ८०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ६० ते ६५ टेम्पो इतकी आवक झाली.
कोथिंबिरीची ९० हजार जुडी आवक
कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि करडईच्या भावात वाढ झाली असून चाकवत, पुदीना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. दरम्यान कोथिंबिरीची सुमारे ९० हजार जुडी तर मेथीची ४० हजार जुडी आवक झाली होती.
मोसंबी, कलिंगड, खरबुज व चिक्कूचे भाव स्थिर
उन्हाच्या झळा सुरू होताच लिंबाच्या सोबतच पपईच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ बाजार व ठोक भागात किंमतीने चढता क्रम धरला आहे. रविवारी देखील मार्केटयार्डातील फळबाजारात पपई आणि लिंबाच्या भावात वाढ झाली असून डाळींबाच्या भावात घसरण झाली आहे, तर अननस, संत्रा, मोसंबी, कलिंगड, खरबुज व चिककूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली़.
फुलांच्या दरात दहा टक्क्यांनी घसरण
मार्केट यार्डात फुलांची आवक साधारण आहे. मागणी कमी असल्याने भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली़.