
पेझारी चेकपोस्ट परिसरात सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या रास्ता रोकोमुळे तब्बल दीड तास वाहतूक ठप्प राहिली. अलिबाग-पेण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तरीही रुग्णवाहिका आणि तातडीच्या वाहनांना मार्ग दिला जात होता, अशी माहिती आयोजकांनी दिली.
रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना कायमच त्रास सहन करावा लागत असून प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसत आहे. याच प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर शेकापने आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं त्यानंतर आंदोलन स्थगित केलं होतं मात्र फक्त आश्वासन नको त्याची अंमलबजावणी देखील व्हायला हवी असं ही ठोस भूमिका शेकापने घेतली आहे. दिवाळीपूर्वी रस्ता न दुरुस्त झाल्यास उग्र आंदोलन करु असा इशारा देखील देण्यात आला आहे.
शेकापतर्फे अनेक वेळा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली होती, मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत अलिबाग – पेण मार्गावर शंभरहून अधिक अपघात झाले असून, 363जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत, तर काहींचा मृत्यूही झाला आहे.आंदोलनकर्त्यांनी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची आणि दर्जेदार कामाची लेखी हमी देण्याची मागणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, शेकापने दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनामुळे पुन्हा एकदा रायगडमधील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे.