रायगड / श्रीकांत नांदगावकर: जिल्ह्यातील वानस्ते गावचे गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावात पाण्याचा कोणताही स्त्रोत नसल्या कारणाने गावकऱ्यांना पाण्यासाठी नेहमी पायपीट करावी लागते. गावकऱ्यांच्या पाण्य़ाची समस्या लक्षात घेत शिवसेना शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने या गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. तळा तालुक्यातील वानस्ते गावाचा पाणीप्रश्न तळा शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. गावात जलगंगा अवतरल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या वानस्ते गावात जवळपास दोन वर्षांपूर्वी बोअरवेल मारण्यात आली होती.
मात्र या ठिकाणी पाणी न लागल्याने गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते.यामुळे गावातील महिलांना डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत होते तसेच महिलांसह ग्रामस्थांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती.ग्रामस्थांनी पाणी टंचाईची व्यथा तळा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली असता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर ग्रामस्थांची ही व्यथा मांडली.
त्यावर मंत्री महोदयांनी गावात बोअरवेल मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतुल क्षीरसागर यांनी जागेची तपासणी करून बोअरवेल मारण्याची जागा निश्चित केली. रविवारी बोअरवेल मारण्याच्या कामाला सुरुवात करताच अवघ्या ३० फुटावर पाण्याचा प्रचंड साठा लागला.अगदी उंच च्या उंच उडत असलेले पाण्याचे कारंजे पाहून ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.वानस्ते गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटविल्याबद्दल ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके,नगरसेवक लिलाधर खातू,नमित पांढऱकामे यांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी गावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नास्कर, उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊत,सचिव नितीन धांद्रुत यांसह वानस्ते ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.