महिलांच्या नावे अश्लील चिठ्ठ्या लिहून घरी पाठवल्या,व्यायाम शाळेतही टाकल्या; सासवणे गावात टवाळखोरांचा हैदोस
भारत रांजणकर, अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात काही तरुणांची दहशत माजवली आहे. गावातील महिला व्यायामशाळेच्या इमारतीच्यावर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी बेकायदा करण्यात येणारे बांधकाम गावातील महिलांनी बंद पडले. याचा राग धरून काही टवाळखोर तरुणांनी व्यायामशाळेत अश्लील भाषेत मजकूर लिहून त्या चिठ्ठ्या व्यायामशाळेत तसेच काही महिलांच्या घरात टाकल्या. यामुळे सासवणे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनासह, पोलिस अधीक्षक तसेच राज्याच्या गृह विभागाकडे अर्ज करीत न्याय मागितला आहे. या अर्जावर ३८४ नागरिकांच्या सह्या असून, शासनाने सर्वप्रथम लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरविणे गरजेचे असल्याचची मागणी केली आहे. तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने व्यायामशाळा परिसरात जमून, या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
सासवणे येथील संतश्रेष्ठ पेडणेकर महाराज मठ परिसरात शासकीय जागेत महिला व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. या व्यायामशाळे लगत तलाव व झाडे होती. येथील जागेतील झाडे तोडून व तलाव बुंजवून बेकायदा क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. मात्र याबाबीकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. येथे कोळीवाड्यातील मुले क्रिकेट खेळायला येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी व्यायामशाळा इमारतीच्यावर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी रूम बांधण्याचा प्रयत्न तरुणांनी केला. या बाबीला गावातील महिलांनी तसेच ग्रामस्थानी विरोध करीत काम बंद पाडले. यांनतर सदर तरुणांनी व्यायामशाळेवर बेकायदा सीसीटीव्ही कॅमेरा जोडला आहे.
महिलांनी रूमचे काम बंद पाडल्याने काही टवाळखोर तरुणांनी महिलांना त्रास देण्यासाठी व्यायामशाळेच्या खिडकीतून व्यायामशाळेच्या आत अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या टाकल्या. तसेच काही महिलांच्या घराच्या परिसरातही अशा आशयाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. याबाबत महिलांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकारामुळे गावातील महिला व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सदर टवाळखोर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्याच्या गृह विभागाकडे केले आहे.
सासवणे ग्रामपंचायत महिला व्यायामशाळेला लागून बेकायदा क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. येथे कोळीवाड्यातील काही मुले क्रिकेट खेळायला येतात. काही दिवसांपूर्वी व्यायाम शाळेच्यावर त्यांनी बेकायदा रुम बांधण्याचा प्रयत्न केला. त्याला महिलांनी विरोध केल्याने सदर मुलांनी महिलांना धमकावणे, त्यांच्या नावाने अश्लील चिठ्ठ्या टाकणे असे प्रकार सुरू केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या महिलांसाठी लाडकी बहिण योजना तसेच महिलांसाठी इतर योजना राबवित आहेत. मात्र त्यांनी या योजनांपेक्षा प्रथम महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी प्रतिक्रिया स्नेहल देवळेकर यांनी दिली.
तसेच, आमच्या गावात काही बेकायदा कृत्य सुरू आहेत. येथील तलाव बुजवून तसेच पेडणेकर मठात ये-जा करण्याच्या क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. आम्ही विरोध केल्यानंतर संबंधित तरुण दादागिरी करतात. महिलांवर दहशत माजविण्याचा प्रकार सुरू आहे. या तरुणांचा आका कोण आहे, हे प्रशासनाने शोधणे गरजेचे आहे असं मत निशिकांत घरत यांनी व्यक्त केलं.
मैदानासाठी झाडे तोडण्यात आली. ग्राउंडलगत असणारा पाण्याचा नाळा बुजविण्यात आला. तरुणांकडून महिलांना व ग्रामस्थांना दादागिरी केली जाते. आम्ही प्रशासनाला घाबरत नाही असे ते सर्रासपणे सांगतात. त्यांच्या पाठी कोणाचा हात आहे, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, असं निवेदिता गावंड यांनी म्हटलं आहे.