सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : ‘ दारू नको, नोकरी दो’…. अशा घोषणांनी राणी लक्ष्मी बाई चौक परिसर (बालगंधर्व) दणाणून सोडत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. मात्र, प्रचंड घोषणाबाजी आणि ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अक्षरशा हात-पायाला धरून उचलून व्हॅनमध्ये टाकले.
हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. पुणे काँग्रेस भवन येथून राणी लक्ष्मी बाई चौकाच्या (बालगंधर्व) दिशेने काँग्रेसने आपला मोर्चा नेला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी 27 जणांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त आंदोलकांनी नोकरीचा मुद्दा उपस्थित केला. पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नसल्याने ताब्यात घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. बेरोजगारीवर तसेच तरुणांना नोकरी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तर आम्हाला ताब्यात घेतले जात आहे. ही दडपशाही आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकार कमी पडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
युवा कॉंंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय बानू चीब यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच अनेक कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. पोलिसांनी उदय बानू चीब यांना ताब्यात घेतल्यानंतर ते म्हणाले की, आम्ही युवकांना रोजगार मागत आहोत, नशा करण्यासाठी परवनगी नाही, त्यामुळे आमचे हल्लाबोल आंदोलन सुरुच रहाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रदेश मिडिया प्रमुख अक्षय जैन, प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, प्रथमेश आबनावे, शहर अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह 27 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आमचे आंदोलन हाणून पाडले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. आम्ही परवानगी घेण्यासाठी गेलो होतो पण आम्हाला परवानगी नाकारण्यात आली, असे आंदोलकांनी सांगितले.
पोलिसांनी दडपशाहिचा आरोप फेटाळला
बालगंधर्वसमोर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांनी फरफटत नेत त्यांनी व्हॅनमध्ये बसवले. बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आमचे आंदोलन सुरुच रहाणार, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, उपायुक्त संदिपसिंह गिल यांनी कार्यकर्त्यांचा आरोप फेटाळून लावत रस्ता मोकळा करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
लोकशाहीची हत्या करून सत्तेत आलेले केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार लुटारुंची, भांडवलदारांची व व्यावसायिकांची टोळी आहे. देशाला ओरबडण्याचे काम भाजपकडून सुरु आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी, तरुणांच्या बरोजगारी, भविष्याविषयी ह्या सरकारला कुठलीच आस्था नाही. गुजरातमधून पुरवठा केल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या नशेत तरुणाईला बरबाद करण्याचे षडयंत्र सुरु असून, देशाचं वाटोळं करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. काँग्रेस शेवटपर्यंत देशातील सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी लढत राहील.
– रोहन सुरवसे पाटील (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)