संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉटेलचे बिल देण्याच्या वादातून कंटेनर चालकाचा चाकाखाली चिरडून खून केल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.
परमेश्वर बालाजी देवराये (वय ३५, रा. नांदेड) असे खून झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी राम दत्ता पुरी (वय २५, रांजणगाव, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुरी याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत रामचंद्र शिवराम पोले (वय ४४, रा. चाकण) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राम पुरी आणि परमेश्वर देवराये चालक आहेत. दोघे संतोष पांचुदकर यांच्या कंटेनरवर चालक म्हणून काम करायचे. गुरूवारी (१३ फेब्रुवारी) देवराये आणि पुरी हे कंटेनरमधून माल घेऊन नगर रोडरील गोदामात आले होते. दोघांनी श्री गणेश वेअर हाऊसमध्ये माल उतरविला. माल उतरविल्यानंतर देवराये, पुरी, पोले रात्री येथील एका हॉटेलात जेवणासाठी गेले. जेवण करुन तिघे गोदामाकडे निघाले. हॉटेलमघील बिल देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून देवरायने पुरी याला मारहाण केली. चापट मारल्यानंतर पुरीने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. पुरीने कंटेनरचा ताबा घेतला व देवरायच्या अंगावर घातला. कंटेनरच्या चाकाखाली सापडून देवरायेचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक वैजनाथ केदार करत आहेत.
कंटेनरचालक देवराये याला चाकाखाली चिरडून मारल्यानंतर आरोपी कंटेनर चालक पुरी कंटेनर घेऊन पसार झाला. वाटेत त्याने दोन- तीन वाहनांना धडक दिली. घटनास्थळी उपस्थित असलेले कंटेनर चालक पोले यांनी आरडाओरडा केला. नागरिकांनी त्याला पाठलाग करुन पकडले. त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.