अलिबाग: रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थ्यांना कोणताही धोका होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज, शनिवार, दिनांक 26 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांपासून या दोन्ही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काही सखल भागांमध्ये पाणी घरात शिरल्याचेही वृत्त आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी राहता येणार असून, पालकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.सध्या तरी इतर तालुक्यांमधील शाळांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, मात्र हवामानाचा अंदाज आणि परिस्थिती पाहून पुढील सूचना दिल्या जातील, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सावित्री नदीने ओलांडली धोका पातळी
मागील 24 तासापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या महाड शहरासह परिसरातील पोलादपूर व महाबळेश्वर येथील पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती नगरपरिषदेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली असून, सकाळी सहाच्या सुमारास नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महिकावती मंदिराच्या इथे असलेल्या पातळीनुसार ती 6पूर्णांक 15 दशांश एवढी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरात पाणी शिरायला केवळ सावित्री नदीच्या दोन पायऱ्या शिल्लक राहिल्या आहेत.
मागील 24 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आगामी दोन दिवस जिल्हा प्रशासनाने मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज इशारा दिला असून संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश रात्री उशिरा दिले आहेत. महाड शहराच्या हाती मध्ये असलेल्या दस्तुरी नाका, गांधारी नाका, या ठिकाणी पुराचे पाणी जमण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले. सखल भागात राहणाऱ्या महाडकर नागरिकांनी तसेच नदी लगतच्या भागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी जावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
प्राप्त परिस्थितीमध्ये स्थानिक प्रशासन कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती महाड आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात आली. शहराच्या हद्दीतील तीन ठिकाणी होड्या व बचाव पथकांची व्यवस्था नगर परिषदेने यापूर्वीच केली आहे. एकूणच आगामी 24 तास महाडकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून 26 जुलै रोजी वीस वर्षांपूर्वी दासगाव येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा आज स्मृतिदिन आहे.
रायगडमधील नद्या दुथडी भरून
रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीचा आज सकाळी ७ वाजता घेण्यात आलेला अहवाल जाहीर झाला आहे. यामध्ये सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती धोक्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे, तर कुंडलिका नदी इशारा पातळी इतकी असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज सकाळी ७ वाजेच्या आकडेवारीनुसार, महाड येथील सावित्री नदीची पाणी पातळी ६.४५ मीटरवर पोहोचली आहे. या नदीची इशारा पातळी ६.०० मीटर असून धोका पातळी ६.५० मीटर आहे. त्यामुळे सावित्री नदी धोक्याच्या पातळीपासून अवघी ०.०५ मीटर दूर असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीची (डोलवहाल बंधारा) पाणी पातळी २३.०० मीटर इतकी नोंदवली गेली आहे, जी तिची इशारा पातळी आहे. या नदीची धोका पातळी २३.९५ मीटर आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या परिसरातील नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी.