कर्जत/ संतोष पेरणे : पावसाला सुरुवात झाली असून अद्याप नालेसफाई ग्रामपंचायतीकडून केली गेली नाही,त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्ते राम हिसालके सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.दरम्यान,नेरळ ग्रामपंचायतला जाग आली असून नालेसफाई करण्यास सुरुवात झाली आहे.नेरळ ग्रामपंचायत मधील तीन मोठ्या नाल्यांची सफाई जेसीबी मशीन द्वारे सुरु केली आहे.
नेरळ गावामध्ये माथेरान डोंगरातील पाणी वाहून नेणारी तीन मोठे नाले आहेत. माथेरान डोंगरातील वाहून येणारे पाणी हे टपालवाडी तसेच दुसरा नाला हा कोतवाल वाडी येथून पुढे जातो. याचबरोबर तिसरा मोठा नाला हा माणगाव टेकडी येथून वाहून जाणारा नाला मातोश्रीनगर भागातून पुढे जातो. या सर्व नाल्यांची सफाई नेरळ ग्रामपंचायत कडून पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याची कामे एप्रिल महिन्यात करणे आवश्यक होते.नाले सफाई करण्यात आली नसल्याने आणि मे महिना संपत आला असताना नेरळ ग्रामपंचायत कडून नालेसफाई झाली नाही.त्यामुळे नेरळ गावातील पर्यावरण स्नेही तरुण राम हिसालके यांनी समाज माध्यमावर नेरळ ग्रामपंचायतीचे वाभाडे काढले.त्या नंतर माध्यमानी देखील नेरळ मधील नालेसफाई यांच्याबद्दल आवाज उठविला. त्यानंतर आजपासून नेरळ ग्रामपंचायत कडून नालेसफाई करण्याचे काम सुरु केले आहे.
नेरळ ग्रामपंचायतीने जेसीबी मशीनचे साहाय्याने मुख्य नाल्यांची सफाई सुरु केली आहे.नेरळ गावातील टपाल वाडी नाल्याची सफाई करण्यास सुरुवात झालीं असून नेरळ पोलीस ठाणे येथे जेसीबी मशीनचे सहाययने नाला सफाई सुरु असून पुढील 15 दिवसात नेरळ गावातील तीन मोठे नाले यांची सफाई पूर्ण होईल अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी दिली आहे.टपालवाडी,कोतवालवाडी आणि मातोश्रीनगर येथील नाल्यांची सफाई सुरु झाली असल्याने नेरळ गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
एकीकडे नालेसफाईला विलंब तर दुसरीकडे भिवपुरी स्थानकाजवळ पादचारी पुलाकडे स्थानिक प्रशासनचं दुर्लक्ष होत आहे. भिवपुरी स्थानक परिसरात
पादचारी पुलावर पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. मध्य रेल्वे वरील भिवपुरी रोड या रेल्वे स्थानकात कर्जत आणि मुंबई दिशेकडे असे दोन पादचारी पुल आहेत.यातील मुंबई दिशेकडे असलेला पादचारी पुल अरुंद असून या पादचारी पुलावरून स्थानकाच्या बाहेर पडण्याची व्यवस्था आहे.मात्र या पादचारी पुलावर पावसाचे पाणी साचून राहत असून साचून राहिलेल्या पाण्याला दाबक्याचे स्वरूप आले आहे.अद्याप मौसमी पाऊस सुरू झालेला नाही आणि तरी देखील अवकाळी पावसामध्ये पादचारी पुलावर पाणी साचून राहत आहे. पुलावरील पृष्ठभाग हा सम पातळीवर बनविला गेला नाही आणि त्यामुळे पुलावर पाणी साचून राहत आहे.त्याचा थेट परिणाम पादचारी पुलावरून येणारे जाणारे प्रवासी यांना त्या पाण्यातून जावे लागत आहे.त्याचवेळी काही भागात प्रवाशांना उड्या मारत जाण्याची वेळ आली आहे.त्यामुळे प्रवासी संघटनेचे माध्यमातून मध्य रेल्वे कडे त्या पादचारी पुलावर साचून राहणारे पाणी याबद्दल कार्यवाही करावी अशी सूचना संघटनेचे किशोर गायकवाड,महेश कडव,राजेश विरले आदी पदाधिकारी यांनी केले आहे.