Karjat News: अखेर आंदोलन मागे; प्रांताधिकारी यांच्या लेखी निवेदनानंतर सुरेश लाड यांचे आंदोलन स्थगित
कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोलिस प्रशासन सहकार्याची भूमिका घेत नसल्याने सकाळी अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन मध्यरात्री एक वाजता स्थगित झाले.माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पायऱ्यांवर सुरू केलेले आंदोलन मध्यरात्री उप विभागीय महसूल अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडून लेखी निवेदन देण्यात आल्यानंतर स्थगित करण्यात आले.दरम्यान, पोलिस ठाण्याच्या पायरीजवळ झोपून आंदोलन करण्याची महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना असून कर्जत पोलिसांच्या कार्यक्षमतेचे धिंडवडे यानिमित्ताने उडाले आहेत.
कर्जत पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार समोरील पायरीजवळ झोपून सुरेश लाड यांनी आंदोलन सुरू केले होते. शेतकऱ्यांना धमकावले जात असताना पोलिसांच्या दाद मागायला गेल्या पोलीस कोणत्याही स्वरूपातील कारवाई करीत नाहीत. पळसदारी येथील शेतकऱ्यांचे जमिनी मधील कल्पतरू बिल्डरकडून होत असलेल्या घुसखोरीबद्दल ही आंदोलन सुरू झाल्यावर पोलिस प्रशासन हादरून गेले.न्यायासाठी एखादा माजी आमदार थेट पोलिस ठाण्याच्या पायरीजवळ झोपून आंदोलन करीत असल्याने त्याची राज्यभर चर्चा झाली. पळसदारी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत.त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी तसेच शेतकऱ्यांना वेळ द्यावी आणि अतिक्रमण थांबवावे. विशेषतः पांडुरंग शिर्के (मुक्काम वर्णे) या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केला आहे.या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली.त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
तालुक्यात भात खरेदी प्रक्रियेत आदिवासी शेतकऱ्यांची लूट कुणी केली? मुस्लिम कब्रस्तानमध्ये पुरलेला मृतदेह खून होता का? युसूफ खान याच्यावर वयक्तिक राग मनात धरून केलेली कारवाई केली जाते. यासारख्या पोलिसाशी संबंधित असलेल्या मुद्द्यांकडेही सुरेश लाड यांनी लक्ष वेधले. दिवसभर कर्जत पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. कर्जतमध्ये अनेक सामाजिक मान्यवर तसेच भाजपची संपूर्ण टीम यानिमित्ताने रस्त्यावर उतरलेली दिसली.दरम्यान, रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांची मध्यस्थी यशस्वी न ठरल्याने रात्री उशिरा शिवथरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यातून बाहेर पडले.मोजणी झाल्याशिवाय कल्पतरू कंपनीने कंपाउंड वॉलचे बांधकाम करू नये या मागणीसाठी भाजप नेते व माजी आमदार सुरेश लाड यांनी पोलिस स्टेशनच्या पायरीवरच झोपून आपले आंदोलन सुरू ठेवले होते.
मध्यरात्री एक वाजता उशिरा कर्जत-खालापूरचे प्रांताधिकारी यांनी या संदर्भात मध्यस्थी करून एक पत्र तयार झाले.रायगड जिल्हाधिकारी आणि अधीक्षक भू अभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून ही निवेदन प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ यांनी तयार केले. त्यानुसार,शेतकऱ्यांनी तत्काळ भू अभिलेख खात्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा आणि दोन दिवसांत मोजणी शुल्क भरावे. त्यानंतर विशेष बाब म्हणून संबंधित जमिनीची मोजणी तातडीने करण्यात येईल. मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपाउंड वॉलचे बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबत पोलीस प्रशासनालाही निर्देश देण्यात आले आहेत असे लेखी आश्वासन प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहे.मध्यरात्री उशिरा एक वाजता माजी आमदार सुरेश लाड यांनी आपले उपोषण सोडले.