कर्जत/ संतोष पेरणे : पावसाला सुरुवात झाली नाही तेच पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम समोर आलं आहे. कर्जत तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे पूल बांधला जात आहे. यंदा मान्सून लवकर दाखल झाला त्यामुळे मे महिन्यात उल्हासनदीला पूर आला. दरम्यान या नवीन पुलाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत .
जुन्या पुलावरून पावसाळ्यात पाणी जात असल्याने त्या पुलावरून होणारी वाहतूक बंद होते आणि त्यामुळे 25 कोटी खर्चून नवीन पूल बांधला जात आहे.मात्र त्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या पिलर साठी वापरण्यात आलेले लोखंडी सळ्या यांचे नुकसान झाले असून त्या लोखंडी सळया बदलण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.
माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग 76 वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दहिवली मालेगाव येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे. उल्हास नदीवर असलेल्या दहिवली मालेगाव या जुन्या पुलावरून पावसाळयात दरवर्षी महापूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाते आणि त्यामुळे पुलावरून पलीकडील गावांसाठी होणारी वाहतूक ठप्प होते.त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत असून त्या पुलाच्या कामासाठी शासनाने 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
या नवीन पुलाचे पिलर उभे राहत असून नदीच्या पाण्यामध्ये पिलर उभे करण्यासाठी लोखंडी सळया उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र दोन पिलर यांच्या सळया या 26 मे रोजी उल्हास नदीला आलेल्या महापुरात सळई यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्या सळया पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहात झुकल्या असून पुलावरून ये जा करणारे वाहनचालक यांच्याकडून लोखंडी सळया आणि पिलर यांची कामे बघून नवीन पुलाच्या कामाचा दर्जा याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे सध्या ज्या दोन पिलरच्या लोखंडी सळया पाण्याच्या प्रवाहात झुकल्या आहेत,त्या बदलण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक रहिवाशी आणि कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे यांनी केली आहे.पुलाचे काम मजबूत व्हावे अशी आमची मागणी असून शासनाने त्या झुकलेल्या पुलाचे पिलर यांची स्थिती लक्षात घेऊन कामाच्या दर्जाबद्दल परीक्षण करावे अशी सूचना केली आहे.
Raigad News : इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होणार ? भर पावसात गावकऱ्यांवर भितीचं सावट