
बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा
सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे शनिवारपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कोकणवासीयांनी गावाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहने मुंबई-गोवा महामार्गावर आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली आहे.
माणगाव परिसरात वाहतूक कोंडीची तीव्रता अधिक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्या आहेत. महाडच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने पुढे सरकत असून वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे प्रवाशांना मोठा खोळंबा सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सवासाठी कुटुंबासह कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. नेहमीपेक्षा प्रवासासाठी अधिक वेळ लागत असल्याने अनेकांचे गाव गाठण्याचे नियोजनही कोलमडले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण असल्याने गणेशोत्सवातील वाढत्या वाहतुकीचा ताण अधिक जाणवत आहे. नागोठणे परिसरातील सर्व्हिस रोडवर खड्डे असल्याने वाहनांचा वेग मंदावत आहे. तर इंदापूर परिसरात काही ठिकाणी सिंगल लेनमधून वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. महामार्गावरील या अडथळ्यांसोबतच अचानक वाढलेली वाहनसंख्या यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
वाहतूक कोंडीसाठी काही बेशिस्त वाहनचालकही कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी काही चालकांकडून मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये राँग साइडने वाहने घुसवली जात आहेत. त्यामुळे दोन्ही दिशांतील वाहतुकीवर परिणाम होत असून कोंडी सोडवणे पोलिसांसाठी अधिक कठीण होत आहे. कोंडीतून लवकर बाहेर पडण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास त्याचा फटका इतर हजारो प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे.
खारपाडा, इंदापूर, माणगाव आणि महामार्गावरील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. वाहने योग्य लेनमधून पुढे पाठवून कोंडी कमी करण्यावर भर दिला जात आहे. पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांनी वाहनचालकांना राँग साइडने वाहने नेऊ नयेत आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. एका वाहनाने नियम मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम संपूर्ण महामार्गावरील वाहतुकीवर होऊ शकतो, त्यामुळे चालकांनी संयम ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो नियोजन करून प्रवास करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.