पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! माथेरानमधील पर्यटन पुन्हा सुरू मात्र.... पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! माथेरानमधील पर्यटन पुन्हा सुरू मात्र....
माथेरान/ संतोष पेरणे : माथेरान या पर्यटन स्थळी पर्यटकांच्या फसवणूक प्रकरणी आणि माथेरान शहराच्या बदनामी प्रकरणी पुकारलेला बेमुदत बंद काल स्थगित करण्यात आला होता. याप्रकरणी कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून कडक धोरण अवलंबले आणि माथेरान बंद स्थगित करण्यात महत्वाची भूमिका घेतली होती.आता आज सर्वत्र शांततेत माथेरान मधील व्यवहार सुरू झाले असून दस्तुरी नाका येथे गाड्यांच्या मागे धावणारे घोडेस्वार आज दिसून येत नाहीत.दरम्यान,दस्तुरी नाका येथील सर्व घोडेस्वार हे प्रशासनाने आदेश दिल्याप्रमाणे चेडोबा देवस्थान येथे घोडे बांधून पर्यटकांच्या दिमतीला आणि नव्याने व्यवसाय करण्यास सज्ज झाले आहेत.
माथेरान पर्यटन बचाव समितीने जाहीर केलेला माथेरान बंद काल दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला होता.त्यानंतर काल १९ मार्च रोजी माथेरान शहरातील सर्व व्यवहार दुपारी चार वाजता सुरू झाले होते.त्यानंतर आज सकाळ पासून पुन्हा माथेरान शहर पर्यटकांनी फुलेल अशी अपेक्षा होती.मात्र सलग दोन दिवस माथेरान बंद ठेवण्यात आला होता.त्या काळात आलेले पर्यटक यांना खाण्याच्या कोणत्याही वस्तू उपलब्ध झाल्या नव्हत्या. परिणामी पर्यटकांचे हाल झाले होते आणि त्यामुळे आज फार तुरळक प्रमाणात पर्यटक हे माथेरान मध्ये आले आहेत.त्यामुळे आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून फार कमी प्रमाणात पर्यटक हे माथेरान मध्ये पर्यटनासाठी आल्याचे दिसून आले.त्यामुळे माथेरान बंद मागे घेऊन पर्यटन व्यवसाय सुरू होऊन देखील पर्यटकांची रोडवलेली संख्या कायम आहे.
एन्ट्री पॉईंट..
प्रशासनाने माथेरान मध्ये कोणत्याही आडवाटेने पर्यटकांना शहरात आणले जाऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यामुळे शहरातील प्रवेशद्वार एकच ठेवण्यात आले असून माथेरान दस्तुरी येथे येणारा प्रत्यके पर्यटक हा स्वागत कमानीमधून शहरात प्रवेश करीत आहे.त्याचवेळी प्रशासनाने ठरवून दिल्याप्रमाणे टॅक्सी स्टँड भागात उभे राहून प्रवासी किंवा खासगी टॅक्सी आल्यानंतर त्या गाड्यांचे मागे पळणारे घोडेवाले हे आज त्या ठिकाणी दिसले नाहीत.ते सर्व घोडेवाले प्रशासनाने ठरवून दिलेल्या एन्ट्री पॉईंटचे आत असलेल्या ई रिक्षा स्टँड जवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला घोडे उभे करून पर्यटकांची वाट पाहत होते.
माथेरान पर्यटन बचाव समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 18आणि 19 मार्च रोजी माथेरान मधील श्रमिक रिक्षा संघटनेने आपल्या सर्व ई रिक्षा बंद ठेवल्या होत्या.माथेरान बंद मागे घेण्यात आल्यानंतर ई रिक्षा पुन्हा स्थानिक नागरिक,पर्यटक आणि विद्यार्थी यांच्या सेवेत आल्या आहेत.
माथेरान शहरात घाट रस्त्याने येणाऱ्या सर्व पर्यटक यांच्यासाठी एकमेव रस्ता मार्ग निश्चित करण्यात आला आहे.त्या एन्ट्री पॉईंट असलेल्या स्वागत कमानी मध्ये पर्यटक माहिती सुविधा केंद्र असणार आहे.त्याचवेळी माथेरान मधील घोडे,हात रिक्षा, इ रिक्षा,मिनी ट्रेन आणि हॉटेल लॉजिंग बोर्डिंग यांचे फलक दरपत्रक लावले जाणार आहेत.असे दरपत्रक माथेरान नगरपरिषद कधी लावणार ? तसेच प्रवासी माहिती केंद्र कधीपासून कार्यान्वित होणार? याबद्दल ठाम माहिती मिळाली नाही.
सोशल मीडियावर 18मार्च पासून माथेरान बंद आहे याची माहिती मिळाल्याने अनेकांनी आपल्या हॉटेल्स मधील बुकिंग रद्द केल्या होत्या.त्यामुळे जेमतेम 400 पर्यटक माथेरान मध्ये आले होते.तर 19 मार्च रोजी टॅक्सी सेवा देखील बंद असल्याची माहिती मिळाल्याने नेरळ येथून माथेरान जाणाऱ्या मिनीट्रेन या पर्यटकांनी भरून गेल्या होत्या.त्या दिवशी देखील साधारण 350 पर्यटक माथेरान शहरात आले होते.मात्र 20 मार्च रोजी माथेरान बंद मागे घेण्यात आल्यानंतर देखील माथेरानकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.अगदी तुरळक प्रमाणात पर्यटक माथेरान मध्ये आल्याने सर्व व्यावसायिक यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले.