माणगाव कुंभे चन्नाट परिसरात अतिउत्साही ब्लॉगर व पर्यटकांचा जीवघेणा खेळ
माणगाव/ प्रवीण जाधव: माणगाव तालुक्यातील कुंभे जवळच्या चन्नाट परिसरात उत्साही ब्लॉगर व पर्यटकांचा जीवघेणा खेळ सुरूच आहे. निष्काळजीपणे येथील धोकादायक ठिकाणी वावर तसेच कुंडामध्ये उड्या मारणे, अशा गोष्टी होतांना दिसत आहे. हा परिसर अत्यंत धोकादायक असून ,याआधी या ठिकाणी अनेक पर्यटक अडकले आहेत तर काही जणांचा जीव देखील गेला आहे.
यापुढे येथे कोणतीही दुर्घटना होऊन एखाद्याचा जीव जाऊ नये यासाठी माणगांव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी वनविभाग, स्थानिक प्रशासन व रेस्क्यू टीम्सचे लक्ष याकडे वेधले आहे. पर्यटकांना देखील हात जोडून आवाहन करण्यात येत आहे, की सिक्रेट पॉइंटच्या वेडापायी आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारचे उपद्रवी धाडसी पर्यटन करणे टाळावे. चन्नाट येथील राखीव वन परिसरात अतिशय धोकादायक व जीवघेण्या चढ उतारांवरून पर्यटक या कुंडांमध्ये पोहण्यासाठी व उड्या मारण्यासाठी जात आहेत.
पुणे आणि मुंबई सारख्या शहरातील काही पर्यटन करणाऱ्या समूहांनी परिसराची पूर्ण माहिती नसताना धोके पत्करून विनापरवाना या भागात टूर्स म्हणजे सहली चालू केल्या आहेत. समाज माध्यमांवरून रील सोबत त्याच्या जाहिराती देण्यात येतात, लाखो व्ह्यूज मिळून समाजमाध्यमांवरून रील व्हायरल होत असल्या कारणाने जीवाची परवा न करता पुन्हा एकदा हा धोकादायक प्रकार सुरू झाला आहे. एखाद्या पर्यटकाचा पुन्हा एकदा येथे जीव जाण्यापूर्वीच तातडीने याला आवर घालणे आवश्यक आहे.
चन्नाट येथील स्थानिक ग्रामस्थ देखील पावसाळ्यात सप्टेंबर ते डिसेंबर महिन्या पर्यंतच येथे पर्यटन करतात परंतु बाकीच्या दिवसांमध्ये सदरचा सर्व परिसर वन्य प्राणी आणि पक्षांसाठी राखलेला असतो, कारण वन्य प्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता फक्त येथील कुंडांमध्येच असते. चन्नाट गावच्या पर्यटन करविणाऱ्या स्थानिक युवकांचा देखील पावसाळा सोडून उन्हाळ्यातल्या ह्या उपद्रवी पर्यटनाला पूर्णपणे विरोध आहे.
पर्यटकांना सदर जंगल परिसरात जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत आम्ही येऊ देणार नाही. येथील वनसंपदेला व वन्य प्राणी-पक्षांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण करू देणार नाही, असे चन्नाटच्या युवकांनी सांगितले आहे. पावसाळ्यात व पावसानंतर चार महिन्यात सर्वत्र मुबलक पाणीपुरवठा असलेल्या परिस्थितीत सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही येथे शाश्वत पर्यटन करवतो परंतु पर्यटकांनी आता उन्हाळ्यात येथे येऊ नये, असे आवाहन चन्नाट गाव आणि करंबेली ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर धाडवे यांनी केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे आजूबाजूला वणवे लागत आहेत. उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांचे पाण्याविना खूप हाल होत आहेत. त्यातच आता वन परिसरात प्राणी आणि पक्षांचे नैसर्गिक अधिवासात पर्यटकांचा दररोज दिवसभर उपद्रव निर्माण होऊन अडथळा निर्माण होऊन आता भर उन्हाळ्यात पाण्याविना त्यांचे हाल होण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
पशु-पक्षांसाठी धोका; सदर वन परिसरात डिसेंबर महिन्यापासून सर्वत्र पाणी आटून फक्त या कुंडांमध्येच कुंभे चन्नाट परिसरात राखीव वनपरिसरात धोकादायक डोंगर व उतारा वरून चढणारे अतिउत्साही पर्यटक प्राणी आणि पक्ष्यांसाठी राखीव असलेल्या कुंडामधून साठलेल्या पाण्यात उड्या मारताना ग्रमास्थांना दिसूव अतिउत्साही उपद्रवी पर्यटक डोकेदुखी ठरत आहेत.