पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ माथेरान मिनीट्रेनच्या फेऱ्यांमध्ये होण्याची शक्यता
कर्जत /संतोष पेरणे : मुंबई ठाणेपासून जवळच असलेलं पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरानमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन मधून प्रवास करता यावा यासाठी उत्सुक असतो.त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ माथेरान नेरळ मार्गावर रुळ बदलणे,स्लीपर बदलणे आदी कामे पूर्ण केल्यानंतर नॅरोगेज मार्गावर गती वाढविण्यासाठी आवश्यक बदल झाले आहे.त्यादृष्टीने या मार्गावर रेल बोर्डाकडून ट्रायल घेण्यात आले असून या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असल्याने आगामी काळात नेरळ माथेरान नेरळ मार्गावर गाड्यांची संख्या वाढणार आहे.दरम्यान,नेरळ माथेरान मार्गावर मिनी ट्रेनची गती सध्या 10 ते 12 किमी प्रति तास अशी असून ही गती 18 किमी प्रति तास होण्याची शक्यता आहे.
ब्रिटिश काळात नेरळ माथेरान नेरळ अशी मिनी ट्रेन सुरु झाली.त्यानंतर जवळपास 100 वर्षे रेल्वे कामगार संपाचा अपवाद वगळता मिनी ट्रेन नेरळ माथेरान नेरळ मार्गावर पावसाळा वगळता व्यवस्थित सुरू होती.त्यावेळी नेरळ ते माथेरान आणि पुन्हा माथेरान ते नेरळ या मार्गावर या गाडीचे इंजिनाच्या वेग हा ताशी 14 असा असायचा.त्यामुळे नेरळ माथेरान हे 21 किलोमिटर अंतर ही मिनी ट्रेन पावणे दोन तासात पार करीत होती.मागील काही वर्षे दोन तासांचे आत कधीही नेरळ माथेरान असा प्रवास मिनी ट्रेनने पूर्ण केलेला नाही.त्यात आता किमान अडीच ते पावणे तीन तास नेरळ माथेरान नेरळ प्रवासासाठी लागत आहे.त्यामुळे हा कंटाळवाणा प्रवास करण्यास पर्यटक प्रवासी देखील नाराजी व्यक्त करतात.त्यातही गेली दोन वर्षे नेरळ माथेरान नेरळ या मार्गावर केवळ दोनच गाड्या चालविल्या जात आहेत.त्यामुळे देखील प्रवाशांमध्ये नाराजी असून गाड्यांची संख्या जास्त असावी आणि ऑन लाईन तिकीट बुकिंग करता यावे अशा मागण्या सातत्याने केल्या जात आहेत.
मिनीट्रेनची गती वाढावी यासाठी गेली तीन वर्षे नेरळ माथेरान या 21 किलोमिटर लांबीच्या मार्गावरील रुळा खाली असलेले 37500 स्लीपर बदलण्यात आले आहेत. त्याचवेळी बहुतांश ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी लहान मोऱ्या बनविण्यात आल्या आहेत तर काही पाईप टाकून आणि दरड प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी गॅबियन वॉल बनविण्यात आल्या आहेत.तर नॅरो गेज मार्गाच्या बाजूला पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी गटारे बनविण्यात आली आहेत.या सर्व प्रकारामुळे नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनचा मार्ग सुरक्षित करण्यात आला आहे.आता त्याच नेरळ माथेरान मार्गावरील चालविण्यात येणाऱ्या मिनी ट्रेन यांची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आल्या आहेत.त्यासाठी रेल्वे बोर्डाची लखनौ येथील सुरक्षा आयुक्तालयाच्या टीम ने तीन डब्यांची मिनी ट्रेनसह नॅरो गेज मार्गावर सुरक्षा विषयक चाचण्या घेतल्या आहेत.
गाडीचा वेग…
गाडीला लावण्यात आलेल्या इंजिनांचा वेग पहिल्या दिवशी 14 किमी प्रति तास तर दुसऱ्या दिवशी 16 किमी प्रति तास आणि तिसऱ्या दिवशी गा वेग ताशी 18 ठेवून गाडी चालविण्यात आली.या तिन्ही दिवसांचे चाचण्या यशस्वी झाल्या असून त्यानंतर सुरक्षा आयुक्तालय लखनौ यांच्याकडून तीन डब्यांमध्ये प्रवासी बसल्यानंतर गाडीचा वेग तपासण्याचा प्रयत्न केला.त्यात तीन डब्ब्यातील प्रवासी यांच्या वजनाचे लोखंड साहित्य त्यात ठेवण्यात आले आणि गाडीची चाचणी घेण्यात आली.त्यावेळी देखील सलग तीन दिवस 14 किमी प्रति तास,16 किमी प्रति तास आणि शेवटी 18 किमी प्रति तास अशी चाचणी घेण्यात आली.त्या तिन्ही दिवशी वजन वाहून नेताना देखील चाचणी यशस्वी झाली आहे.
गाड्यांची संख्या वाढणार…
नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन यांचा गाडीचा वेग कमी असल्याने नेरळ माथेरान मार्गावर सध्या केवळ दोनच गाड्या चालविल्या जातात.त्या गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी रेल बोर्डाने पुढाकार घेतला असून गाड्या वाढविण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेली चाचणी महत्वाची ठरणार आहे.त्यामुळे नेरळ माथेरान नेरळ मार्गावर मिनी ट्रेनची संख्या वाढविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
ऑनलाईन तिकीट खिडकी सुरू करावी..
गेल्या काही वर्षापासून नेरळ माथेरान नेरळ या मार्गावर चालविण्यात येणारी मिनी ट्रेनची तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढता येत नाही.नेरळ आणि माथेरान येथे मिनी ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास आधी तिकीट खिडकी खुली केली जाते.त्यामुळे अनेक पर्यटक प्रवाशांना तिकीट मिळत नाही आणि त्यामुळे ऑनलाईन तिकीट खिडकी पुन्हा सुरू करावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जाते.