पेण/ संतोष पेरणे: पेण तालुक्यातील तांबडी येथील नामदेव ठाकरे यांची नऊ वर्षाची मुलगी खुशबू हीचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घालावे अशी मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.दरम्यान, आमदार थोरवे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेवून रीतसर पत्र देवून मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
अखिल भारतीय पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून पेण येथील वरवणे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या चौथी इयत्तेतील खुशबू नामदेव ठाकरे हीचा कुष्ठरोगावर उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.२२ डिसेंबर रोजी खुशबू नामदेव ठाकरे हीचा मृत्यू झाला होता. संबंधित प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून सुदृढ असलेल्या खुशबू हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले. चुकीची औषधे दिल्याने खुशबू हीचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी दोषी असलेल्या आरोग्य विभाग तसेच शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी विभाग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरक्षा परिषदेने केली आहे.संस्थेचे राष्ट्रिय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि प्रदेश अध्यक्ष रतन लोंगले यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार थोरवे यांना सादर केल्यानंतर या संस्थेने रायगड जिल्हाधिकारी यांना या निवेदनाची प्रत पाठवून दिली आहे.
खुशबू मृत्यू प्रकरणी काय सत्य आहे हे बाहेर आलेच पाहिजे.त्याचवेळी नामदेव ठाकरे यांचा काळजाचा तुकडा यंत्रणेच्या चुकीमुळे हिरावून गेला आहे.त्यामुळे या प्रकरणाची उकल व्हावी आणि खुशबू नामदेव ठाकरे हिला न्याय मिळावा यासाठी आपण राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सोमवार मुंबईत भेट घेणार आहोत. त्यावेळी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन देखील देणार असल्याचे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस मित्र सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी यांना दिले आहेत.