अलिबाग : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ विधीमंडळाच्या अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले आहे. असं असलं तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे,रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार , विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष – संघटनांनी केला आहे.
यापूर्वी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी २२ एप्रिल रोजी एकूण ७८ ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती . ३० जून रोजी मुंबई येथे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले होते. या समितीने जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या नुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सुचना व विरोध नोंदवण्यात आला आहे.राज्य भरातून १३००० हरकती दाखल करण्यात आलेल्या होत्या . त्यापैकी ९५०० हरकती सदर विधेयक रद्द करा हे स्पष्ट मांडणा-या होत्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे .यावरून जनसामान्यांच्या मनात या विधेयकाबाबत काय आहे हे लक्षात येते. तरीही त्या सर्व हरकतींची दखल न घेता हा कायदा पुढे रेटण्यात आला.तसेच सदर विधीमंडळाच्या संयुक्त समिती ने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. हे लोकशाही प्रक्रियेला साजेसे नाही. याचा आम्ही यापूर्वी निषेध केला आहे.हा सर्व विरोध व जनमानस डावलून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाशवी बहुमताच्या जोरावर सदर कायदा मंजूर करण्यात आला.
हा कायदा लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारा आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची, सरकार ला लोकशाही मार्गाने जाब विचारणारे यांची गळचेपी करणारा आहे .आता या कायद्याच्या विरोधात सामान्य, निडर नागरिकच उतरतील. म्हणून या कायद्याच्या विरोधात १४ ऑगस्ट २०२५ रोजी , स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला
मुंबईमधे नागरिकांचा जोरदार विरोध नोंदविण्यासाठी व राज्यभर आंदोलनाचा कार्यक्रम घोषित करण्यासाठी निर्धार परिषद आयोजित करण्यात येत आहे.ही परिषद यशवंतराव चव्हाण सेंटर मधे दुपारी एक ते पाच या वेळेत घेण्यात येईल.
सदर परिषदेत अनेक मान्यवर, कलाकार, पत्रकार, वकील, साहित्यिक, व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित रहाणार आहेत.
त्यामधेपी. साईनाथ ,किरण माने, सुरेश खोपडे , संभाजी भगत , प्रज्ञा पवार , तुषार गांधी , एस. एम. देशमुख ,ॲड मिहिर देसाई , तिस्ता सेटलवाड , दीपक पवार ,मिलिंद रानडे, डॉ डी एल कराड, आनंद पटवर्धन, धनाजी गुरव हे मान्यवर आहेत.
तसेच विविध राजकीय, सामाजिक नेते उपस्थित रहाणार आहेत. सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी,शैलेंद्र कांबळे, उल्का महाजन, ब्रायन लोबो ,कॉ भारत पाटणकर ,किशोर ढमाले , आमदार विनोद निकोले , अजित नवले ,बाळाराम पाटील ,उदय भट, शाम गायकवाड , अबू आझमी , डॉ. भालचंद्र कांगो हे मांडणी करणार असून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे , हर्षवर्धन सपकाळ , शरद पवार आवर्जून उपस्थित रहाणार आहेत.