Raigad News : विजेच्या धक्क्याने तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
कर्जत / संतोष पेरणे: तालुक्यातील चांधई येथे शेतामध्ये चारा खाण्यासाठी गेलेल्या तीन म्हशींचा विजेच्या तारेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून दुभत्या म्हशी यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान,या प्रकरणी महावितरण कंपनी कडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित म्हशींच्या मृत्यूचे पंचनामे करण्यात आले असून ते सर्व पंचनामे वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जातील अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून सतत सुरू राहिलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे.त्यात आता शेतामध्ये पडलेली विजेची वाहिका बाजूला करण्याची सूचना चांधई गावातील शेतकऱ्यांनी दिली होती.मात्र तरी देखील महावितरण कडून त्याबाबत निरुत्साह दाखवण्यात आला.चांधई गावातील शेतकरी महेश बंडू थेर हे आपल्या दुभत्या म्हशी घेवून शेतजमिन असलेल्या ठिकाणी गेले होते.रविवारी संध्याकाळी म्हशी आणि गुरे शेतात बागडत असताना तेथील जमिनीकडे झुकलेली विजेची तार यांचा धक्का म्हशींना लागला.
आधी विजेच्या खांबावरील तार तुटल्याचे लक्षात आले नाही. पण जसे सर्व प्राणी विजेच्या धक्क्याने थरथरायला लागले तेव्हा शेतकरी महेश थेर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तेथे असलेल्या गुरांपैकी काही गुरांना वाचविण्याचां प्रयत्न केला.मात्र तरी देखील तीन म्हशी यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
त्या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देण्यात आली.त्यानंतर महावितरण कडून कडाव येथील सहायक अभियंता डांगी यांनी पंचनामे करून घेण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे.कडाव कार्यालयातून सर्व कागदपत्रे कर्जत उप विभागीय अधिकारी कार्यालयात पाठवण्यात आली असून कर्जत कार्यालयाकडून महावितरण कंपनी कडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन महावितरण चे उप अभियंता चंद्रकांत केंद्र यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.