
Raigad News: एकीकडे दुष्काळाची चिंता, दुसरीकडे पाण्याची नासाडी! श्रीवर्धनमध्ये रस्त्यालगत जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया
कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसेमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; शशिकांत कांबळे यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
यंदा पावसाचे अनियमित प्रमाण आणि निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे आवश्यक असताना मुख्य रस्त्यालगतच जलवाहिनी फुटून पाणी वाहून जात असल्याची घटना प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधणारी ठरत आहे. विशेष म्हणजे, ही घटना एखाद्या दुर्गम भागात घडलेली नसून श्रीवर्धनला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यालगत घडली आहे. या मार्गावरून दिवसभर शेकडो वाहने धावत असतात. (फोटो सौजन्य – AI Created)
नागरिकांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारीही याच मार्गावरून प्रवास करतात. असे असतानाही फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याची बाब संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास कशी आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या मुख्य रस्त्याखाली स्थानिक ‘आरती’ ग्रामपंचायत, श्रीवर्धन नगर परिषद आणि ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे फुटलेली जलवाहिनी नेमकी कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणेने ही जलवाहिनी तातडीने दुरूस्त करावी.
शासनाकडून एकीकडे पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांची गरज व्यक्त होत असताना प्रत्यक्षात मात्र पाण्याची अशी उघडपणे नासाडी होत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. आज वाया जाणारे हे पाणी भविष्यात टंचाईच्या काळात नागरिकांच्या उपयोगी पडू शकले असते, त्यामुळे या घटनेकडे केवळ किरकोळ तांत्रिक बिघाड म्हणून न पाहता गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने कोणत्याही लेखी तक्रारीची वाट न पाहता तातडीने घटनास्थळी पाहणी करावी.
राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी
जलवाहिनी कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येते, याची खातरजमा करून त्वरित दुरुस्ती करावी आणि पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाणी बचतीबाबत केवळ आवाहने न करता प्रत्यक्ष कृतीतून जबाबदारी दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.