कोयना धरणांतर्गत पावसाचा जोर वाढला; धरणात 76.81 टीएमसी पाणीसाठा
पाटण : कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत आहे. छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी १६ हजार ३८१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ७६.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे २८.४४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व विभागात मुसळधार पाऊस सुरू झाला असून, भात लागण व पेरणीची कामे वेगात सुरू झाली आहेत. पावसाने यात व्यत्यय येत असला तरीही शेतकरी पेरणीची घाई करत आहेत. कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे उघडले असून, ते सध्या साडेतीन फुटांवर स्थिर आहेत. त्यातून ९ हजार ३०० व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २ हजार १०० असा एकूण ११ हजार ४०० क्युसेक पाणीविसर्ग पूर्वेकडे नदीपात्रात सुरू आहे. यावर्षी १ जूनपासून पडलेला एकूण व आजचा पाऊस कोयना ५६ (२५५६), नवजा १०१ (२६३५) तर महाबळेश्वर ९६ (२६५०), असा आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Weather alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, आज रेड आणि येलो अलर्ट कोणत्या भागात
दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही भागात हवामान विभागाने रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट जारी केले आहेत. ‘विफा’ चक्रीवादळाच्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारा आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
उत्तर कोकणात हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’
उत्तर कोकणात आणि मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा
कोकण किनारपट्टीवर पुढील २४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरीत आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.