Raj Thackeray and Uddhav Thackeray Appeal Marathi people vijayi sabha 2025
Raj and Uddhav Thackeray : मुंबई : राज्यामध्ये सध्या हिंदी विरुद्ध मराठी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शालेय शिक्षण धोरणामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय देण्यात आला. यामधील अनिवार्य शब्द काढण्यात आला असला तरी हिंदी पर्यायी भाषा आणल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. याविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई राखण्यासाठी दोन्ही भाऊ मागील उणीधुणी विसरुन एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र त्यापूर्वीच मराठी भाषेच्या लढ्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार आहेत. येत्या 5 जुलै रोजी मुंबईमध्ये राज्य सरकारविरोधात आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहेत. ठाकरे गट आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा असणार आहे. यामुळे मराठी माणसे सुखावली असून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे मराठी भाषेचा लढा तीव्र होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांनी शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पहिला शासन आदेश रद्द करुन यामधील अनिवार्य शब्द काढण्यात आला. मात्र त्यानंतर हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून जाहीर करत पर्याय म्हणून ठेवण्यात आली. यानंतर देखील राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. तसेच राज्यांमधील शाळेतील मुख्याध्यपकांना पत्र लिहित भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली. मात्र यानंतर देखील राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील समन्वय समितीसोबत चर्चा करुन राज्य सरकार विरोधात भूमिका घेतली होती. दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या मोर्चाची घोषणा केली होती. तसेच सर्व राजकीय पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन देखील केले होते. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवेगळा नाही तर एकत्रित मोर्चा होणार आहे. यामुळे मराठी माणसांमध्ये एक उत्साह दिसून येत आहे. मराठी भाषेसाठी मराठी माणसांनी एकत्र यावे असे आवाहन ठाकरे बंधूंकडून केले जात आहे. या मोर्चामध्ये केवळ राजकीय पक्ष नाही तर कलाकार, साहित्यिक, लेखक आणि सर्व मराठी माणसांनी एकत्रित यावे अशी अपेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून व्यक्त केली जात आहे.