फोटो सौजन्य - सोशल मीडिया
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरेंसह पत्नी शर्मिला ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे देखील पालखी सोहळ्याला उपस्थित रहणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी राज ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर राज ठाकरे पालखीची पूजा करतील. त्यानंतर ते वारीत देखील सहभागी होणार आहेत. तसेच यावेळी राज ठाकरे पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वाऱ्यांकरऱ्यासोबत देखील संवाद साधणार आहेत. पालखी सोहळ्यत सहभागी झाल्यानंतर राज ठाकरे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहेत.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेने रवाना झाली. आषाढी एकादशीसाठी दरवर्षी लाखो भाविक विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान होणार आहे. पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी २१ जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल. तसेच संत गजानन महाराज यांची पालखी १३ जून रोजी आषाढी एकादशीसाठी शेगावातून पंढरपूरकडे रवाना झाली. त्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज त्र्यंबकेश्वर येथून पंढरीसाठी प्रस्थान करणार आहे.
अनेक भाविक खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने तर काही जण विविध पालखींसोबत चालत दिंडीने पंढरपुरात येतात. आषाढी वारीसाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एसटी बसने नवी सेवा सुरु केली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असलेल्यांना त्यांच्या गावापासून पंढरीपर्यंत विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी देखील एसटी महामंडळाने आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ४ हजार २४५ विशेष बसेस सोडल्या होत्या.