
कोल्हापूर : सत्तेच्या काळात शिक्षक बँकेचा (Teachers Bank) परवाना रद्द करण्याची नामुष्की आली होती. त्यांना बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वतःच्या चेअरमनपदाच्या काळात आपण काय दिवे लावलेत हे सुज्ञ सभासदांना माहित आहेत. त्यामुळे सतरा भानगडी असणाऱ्या विरोधकांना सुज्ञ सभासद जागा दाखवतील, असा घणाघात राजाराम वरुटे यांनी केला.
कबनूर (ता. हातकणंगले) येथे शिक्षकसंघाच्या सत्तारूढ पॅनेलच्या प्रचार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुकाणू समितीचे दा. श. सुतार होते. वरुटे म्हणाले, विरोधी संघ समिती पॅनलप्रमुख रवीकुमार पाटील हे बँकेचा नफा खोटा असल्याचे बोलत आहेत. त्यांच्या या अज्ञानाची कीव करावी वाटते. बँकेच्या लेखपरिक्षणातून नफ्याची आकडेवारी जाहीर होते. पूर्वी ज्यादा झालेला एनपीए लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने शिक्षक बँकेचा परवाना रद्द करण्याचे ठरवले होते. परंतु, २०१० साली मोठ्या विश्वासाने सभासदांनी आमच्या सर्व १७ संचालकांना निवडून दिले. त्यापासून सर्व संचालकांनी काटकसरीचा कारभार करून शिक्षक सभासदांची आर्थिक संस्था वाचवली.
शिक्षकसंघ कामात देखील अग्रेसर राहिला आहे. एमएससीआयटी, मुख्यालयी राहण्याची अट, आगाऊ वेतनवाढ, विज्ञान प्रमोशन या व अन्य शिक्षकांच्या समस्यांसाठी नेहमीच पाठपुरावा केला आहे. सभासदांनी या दोन पंचवार्षिक काळात विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवला आहे.
विद्यमान संचालक राजमोहन पाटील म्हणाले, शिक्षक संघाच्या नेतृत्वाने हातकणगले तालुक्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकत तीन उमेदवार दिले आहेत. या तिन्ही जागा निवडून आणल्याशिवाय एकत्र स्नेहभोजन करणार नाही.